ब्लॉग : वाचा का साजरी होते मंगळागौर

प्रातिनिधिक फोटो

jyotsna-gadgil>>ज्योत्स्ना गाडगीळ

‘डोळे नुसते पेंगतातेत, आज काही काम होईल असं वाटत नाही.’
‘माझीही अवस्था तीच आहे, पण राव साहेबांनी फाईल आज सबमिट करायला सांगितलीय. काम उरकावच लागेल. ती अंजली बघ, खुर्चीवरून पडली नाही म्हणजे मिळवलं. शुक शुक…अंजूsss’
‘हो हो आहे जागी. पण जाम थकवा आलाय. किती वर्षांनी एवढं खेळले असेन मी, माझंच मला आठवत नाहीये. काल धमाल आली, पण आता अंग मोडून आलंय.’
‘ए इकडे या सगळ्या जणी पटकन, गोगटे बाईंनी कालचे फोटो पाठवलेत बघा. सुर्वे आणि कर्वे तुमच्या जोडीचा हा फोटो काय मस्त आलाय बघा.’
‘ए खरंच गं, मलापण सेंड कर नं. फोटो पाहून सगळी झोपच उडाली. मस्त फ्रेश वाटलं आणि पुनः मंगळागौरीचा जागर करायला तन-मन सज्ज झालं.’
‘ये बाsssत है…वाटलं न फ्रेश, आता लागा कामाला. नाहीतर आज ऑफिसमध्येच सगळ्यांना जागरण करत बसावं लागेल.’
‘मला तर घरी जायचीच भीती वाटतेय. माझा नवरा आणि मुलगा काय म्हणेल काय माहीत. काल कधी नव्हे ते परस्पर निरोप सांगून तुमच्याबरोबर मंगळागौरीला आले आणि गोगटे बाईंकडेच मुक्काम केला. आज काही खरं नाही.’
‘राऊत मॅडम, काहीतरीच काय? पन्नाशी पार केली, तरी काय बिचकून राहताय घरच्यांना.’
‘मग काय तर, एक दिवस जेवले असतील बाप-बेटे बाहेर, एवढी काय काळजी करायची?’
‘अहो, तसं नाही सावंत, आमच्या ह्यांना आणि मुलाला संध्याकाळी गरमागरम पोळ्या लागतात. सकाळचा स्वयंपाक चालत नाही. सासूबाईंनी सवय लावून ठेवलीय.’
‘बरोबर, सासूबाईंनी त्यांच्या मुलाला सवय लावली आणि तुम्ही तुमच्या मुलाला. काय हरकत आहे सकाळचं संध्याकाळी खायला? अगदी शिळं खाल्लं तरी काय बिघडतं?’
‘अगदी बरोबर! गोगटे बाई सांगत होत्या, याबाबतीत त्या त्यांच्या सुनेला आदर्श मानतात. कालपर्यंत कप-बशी न उचलणारा त्यांचा मुलगा, सुनेच्या लाडिक बोलण्यामुळे जेवण झालं की आवरायला तिला मदत करतो. जेवणात तिने काहीही केलेलं चालवून घेतो. रविवारी चहा-नाश्ता तोच बनवतो. हा फंडा आता त्याही वापरू लागल्या आहेत म्हणे! तो इफेक्ट काल जाणवला. गोगटे काका हिरीरीने सगळ्यांना मदत करत होते, पाहिलंत ना?’
‘असेल बाई, पण आमच्याकडे नाही सुधारणार कोणी.’
‘अहो बायकांनी काय आयुष्यभर ‘रांधा, वाढा,उष्टी काढा’ ह्यातच जन्म घालवायचा का? पुरुषांनाही करू देत की थोडीफार मदत. परदेशात सगळ्यांना सगळी कामं आपापल्या हाताने करावी लागतात, मग देशात राहून केलं, तर कुठे बिघडलं?’
‘करेक्ट बोललीस स्नेहल. अहो राऊत मॅडम, सगळ्या गोष्टी हातात नेऊन देण्यात कमीपणा वाटण्याचा प्रश्न नसतो, पण तुम्ही समोरच्याला परावलंबी बनवताय त्याचं काय? तुमच्या पश्चात तुमची सून पुरवणार आहे का हे सगळे चोचले? उगीचच नसत्या सवयी लावू नका. घरच्यांना थोडी सवय होऊ द्या.’
‘नाहीतर काय. जरा आपण अंथरुणाला पाठ टेकवली, की घरच्यांच्या कपाळाला आठ्या येतात. आपण आजारी पडलो, की घरचं कोण करणार याची काळजी लागलेली असते सगळयांना.’
‘हेच काळानुकाळ चालत आलं आहे. यातून थोडी उसंत म्हणून ही मंगळागौर, भोंडला, जागरण, हळद-कुंकू समारंभ…अहो, बाईला स्वतःच्या हातचं खाऊन खाऊन कंटाळा येतो, आयतं जेवण मिळावं असं वाटत असतं, म्हणून तर सवाष्ण जेवू घालण्याचा सोपस्कार. नुसतं जायचं आणि पाटावर बसून जेवायचं. हा प्रत्येक अन्नपूर्णेचा मान असतो आणि तेवढीच बायकांना घरच्या कामातून उसंत! आता आपण कंटाळा आला, की हॉटेलला जाण्याचा किंवा हॉटेलमधून जेवण मागवण्याचा फतवा काढतो, पण पूर्वी कुठे तशी सोय होती. ‘
‘हो, हेच कारण असावं, आपल्या व्रत-वैकल्यांचं, सणा-वारांचं. मध्यंतरी वारीत गेलेल्या एका खेडेगावातल्या महिलेनेसुद्धा हीच भावना व्यक्त केली होती. वर्षभर चूल-मूल सांभाळणाऱ्या बाईला विठोबाच्या दर्शनाच्या निमित्ताने उंबरठ्याबाहेर पडता येतं, वारीत बेभान होऊन नाचता येतं, गाता येतं, मनसोक्त बोलता येतं.आपण तरी शहरात राहतो, नोकरीनिमित्त घराबाहेर पडतो, लग्न-सोहळे-सहल अटेंड करतो, पण गावातल्या बायकांना अजूनही घराबाहेर पडायला अशा नैमित्तिक सोहळ्यांची वाट पहावी लागते.’
‘त्यामुळे राऊत मॅडम, फार पॅनिक होऊ नका. नसत्या गोष्टींचा इशू करू नका. पुरुष काय की स्त्री काय! प्रत्येकाला आयुष्य एकेकदाच मिळतं. कोणाच्या भीतीखाली जगून ते वाया घालवू नका. मस्त आनंदाने जगा आणि घरच्यांनाही तशीच सवय लावा.’
‘बरं! आज ठासून सांगतेच घरच्यांना. पुढच्या मंगळवारी कुलकर्णींकडे मंगळागौरीला जाणार आहे आणि तिथेच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी ऑफिस करून येणारे. जेवणाचं काय ते बघून घ्या. तेवढीच मला उसंत!’
‘हाहाहा. क्या बात है!’
‘बोला मंगळागौरी माताssss की जय!’

summary- blog on mangalagaur