‘नवाज’ ते ‘नवाब’!

>>ज्योत्स्ना गाडगीळ

‘इथे जमलेल्या तमाम बंधू आणि भगिनींनो, जय महाराष्ट्र!’ हे मंतरलेले शब्द ज्याच्या रूपाने पुन्हा एकदा ऐकायला, बघायला आणि अनुभवायला मिळणार आहेत, तो बहुचर्चित अभिनेता आहे, नवाजुद्दीन सिद्दिकी! ‘ठाकरे’ ह्या आगामी चित्रपटात त्याने शिवसेनाप्रमुखांची भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. तो आपल्या अभिनयाच्या जोरावर ह्या भूमिकेला पुरेपूर न्याय देईल, असा विश्वास खुद्द अमिताभ बच्चन ह्यांनीदेखील व्यक्त केला आहे. ही भूमिका आपल्या आयुष्याला कलाटणी देणार असल्याची खात्री नवाजने व्यक्त केली आहे. त्याच्या ह्याच आत्मविश्वासामुळे त्याने ‘नवाज ते नवाब’ हा प्रवास पार केला आहे.

‘मी अभिनेता आहे, अॅक्टिंग करून दाखवू?’ दिग्दर्शकांचे उंबरठे झिजवून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपडणारा नवाज, कुठेही, कोणासमोरही अभिनयाची चाचणी देण्यास सज्ज असे. ही गोष्ट आहे १२ वर्षांपूर्वीची! तेव्हा तर अभिनय क्षेत्राशी त्याचा दुरान्वये संबंधही नव्हता, परंतु नियतीने त्याच्या आयुष्यात असंख्य चढ-उतार दाखवून त्याला सिनेसृष्टीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता बनवला.

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुधाणा ह्या छोट्याशा गावातला सधन कुटुंबातील मुलगा नवाजुद्दीन सिद्दिकी. नऊ भावंडांमध्ये थोरला. गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणाचा ध्यास घेत थेट हरिद्वार येथे पोहोचला. गुरुकुल कांगडी विश्वविद्यालयातून त्याने रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केली. वडोदरा येथे वर्षभर केमिस्ट म्हणून नोकरी केली. तिथे एका मित्राबरोबर आयुष्यात पहिल्यांदा त्याने थेटरला जाऊन नाटक पाहिले. नाटकातील कलाकार आणि प्रेक्षक ह्यांच्यातील ‘केमिस्ट्री’ त्याने प्रत्यक्ष अनुभवली आणि प्रभावित होऊन त्याने अभिनयात करिअर करण्याचा ध्यास घेतला.

त्याच मित्राच्या सांगण्यावरून त्याने दिल्ली गाठली आणि अभिनय प्रशिक्षणासाठी ओळखली जाणारी संस्था ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ येथे प्रवेश मिळवण्यासाठी धडपड सुरू केली. मात्र तिथे प्रवेश मिळवण्यासाठी नाटकांत काम केल्याचा पूर्वानुभव लागतो, हे कळल्यावर नवाज एका नाटक कंपनीत सहभागी झाला. पथनाट्य करू लागला, गल्लीबोळातील कार्यक्रमात नाटकाचे प्रयोग करू लागला. चरितार्थासाठी त्याने दिवसा पहारेकऱ्याची नोकरी पत्करली. त्या मिळकतीवर गुजराण करून तो रात्री नाटकांच्या तालमी आणि प्रयोग करू लागला. त्याला घरून पैसे मागवणे सहज शक्य होते, मात्र त्याने घेतलेल्या निर्णयाला घरच्यांचा पाठिंबा नव्हता. म्हणून तो स्वकष्टाने आपली लढाई आपणच लढत होता. दहा-बारा नाटकांचा अनुभव गोळा करून त्याने नॅशनल स्कुलमध्ये प्रवेश मिळवला. तिथे त्याच्या मूलभूत सुविधांची काळजी घेतली जाणार होती, त्याने फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित होते, तसे त्याने ते केलेही!

अभिनयाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तमाम कलाकारांप्रमाणे नवाजदेखील आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबापुरीत आला. नॅशनल स्कुलमध्ये त्याच्या ओळखीचे काही सीनिअर विद्यार्थी मुंबईत राहात होते, त्यांच्याकडे तो भाड्याने राहू लागला. परंतु भाडे देण्याचेही पैसे नसल्याने तो त्या सर्वांचे घरकाम, स्वयंपाक, धुणे-भांडी करून काम मिळवण्यासाठी धडपडू लागला.

नवाज दिसायला अगदीच सर्वसामान्य असल्याने लोक त्याला पिटाळून लावत. ‘आरशात चेहरा बघ’ असा सल्ला देत. ‘दोन लाईट्स तर तुला उजेडात आणण्यासाठी लागतील’ अशी जहाल टीका त्याच्या कृष्णवर्णाला उद्देशून करत. त्याच्या गरीब चेहऱ्याकडे बघून गरीब लोकांच्या गर्दीतला एक म्हणून निवड करत. अशा अनेक टक्क्या-टोणप्यांमुळे नवाज ढासळून न जाता अधिक कणखर बनला होता. ओम पुरी, मनोज वाजपेयी, नसरुद्दिन शाह ही सर्वसामान्य चेहऱ्याची मंडळी जर सुपरस्टार बनू शकतात, तर आपणही अभिनयाच्या जोरावर किमान चांगला अभिनेता नक्कीच बनू शकतो, याचा त्याला आत्मविश्वास होता. तो प्रयत्न करत राहिला. ‘सरफरोश’ चित्रपटात त्याला चाळीस सेकंदाची भूमिका मिळाली. त्यात त्याला पोलिसांचा मार खाण्याचा अभिनय करायचा होता. ती भूमिका त्याने जीव ओतून केली.

सुपरस्टार आमिर खानच्या चित्रपटात थोडी बरी भूमिका मिळाली, ह्या आनंदात तो गावी गेला. मात्र गावकऱ्यांच्या लेखी ‘मार खाणारा’ नाही, तर ‘मारणारा’ अभिनेता असतो. तिथेही जाऊन मार खाल्ला तरी अभिनयाचे भूत उतरत नाही, अशी गावकऱ्यांनी शेरेबाजी केली. डिस्कव्हरीवर प्राणी झळकू लागले, पण हा अजून दोन मिनिटेही स्क्रिनवर झळकू शकला नाही, अशा शब्दात ते नवाजची खिल्ली उडवली. ह्या शेरेबाजीला कंटाळून नवाजने पण केला, चांगली भूमिका केल्याशिवाय गावी परतायचे नाही.

‘सरफरोश’मधील नवाजची भूमिका गावकऱ्यांना साधी वाटली, तरी दिग्दर्शक अनुराग कश्यपला ती खूप भावली. त्याने नवाजला घेऊन चित्रपट काढणार असा त्याला शब्द दिला. मुंबईत राहून सात वर्षे झाली, तरी चांगलेसे काम हाती लागत नव्हते. परतीचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे ह्या क्षेत्रात राहून धडपड करणे हा एकमेव मार्ग त्याच्याकडे शिल्लक होता. तो गावी गेला नाही. आईशी पत्राच्या माध्यमातून संपर्कात राहिला. ‘बारा वर्षांत कचऱ्याचे भाग्य बदलते, तर तुझे का नाही?’ हे आईचे शब्द नवाजला स्फुरण देत असत. अजून बारा वर्षे कुठे झाली? अशी स्वत:ची समजूत काढत नवाज सातत्याने प्रयत्न करत राहिला. कधी चोर, कधी वेटर, कधी भिकारी…मिळेल ती भूमिका स्वीकारत त्याने आपली घोडदौड सुरू ठेवली.

नवाजच्या आईचे शब्द खरे ठरले. अभिनय क्षेत्रातील एक तप पूर्ण झाले आणि त्याला ‘पिपली लाईव्ह’ चित्रपटात पत्रकाराची भूमिका मिळाली. त्या चित्रपटात त्याला खऱ्या अर्थाने कलाकार म्हणून ओळख मिळाली. त्या चित्रपटाच्या यशानंतर नवाजने मागे वळून पाहिले नाही. अनुराग कश्यपने त्याला ‘गँग ऑफ वासेपुर’ चित्रपटात मुख्य भूमिका दिली आणि त्या भूमिकेतून त्याने समस्त बॉलीवूडकरांचे लक्ष वेधून घेतले. तलाश, लंच बॉक्स, बदलापूर, किक, बजरंगी भाईजान, मांझी हे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. त्याचे गावकरी त्याला आता ‘नवाज’ नाही, तर ‘अभिनयातला नवाब’ म्हणून ओळखू लागले.
‘गँग ऑफ वासेपूर’च्या यशानंतर त्याने २७५ स्क्रिप्ट न वाचता रद्द केल्या. कारण त्याला एका भूमिकेत अडकायचे नव्हते. आपल्यात सर्वप्रकारच्या भूमिका करण्याची क्षमता आहे, यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. कथानक ऐकून, आपल्या वाट्याला येणाऱ्या व्यक्तिरेखेचा पूर्वाभ्यास करून मगच तो चित्रपटांची निवड करू लागला. शूटिंगच्या दरम्यान अनेकदा त्याचे अपघात झाले, परंतु त्याने कामात व्यत्यय येऊ दिला नाही. तो भूमिकेत शिरला की देहभान विसरून जात असे. अशाच एका अपघाताच्या वेळी त्याला ऑपरेशन थेटरमध्ये घेण्यात आले, तिथेही तो आपल्या व्यक्तिरेखेच्या संवादाची उजळणी करत होता, हे त्याच्या डॉक्टरांनी त्याला तो शुद्धीवर आल्यावर सांगितले.

बॉलीवूडमधील तीनही सुप्रसिद्ध खानांबरोबर काम करूनही त्यांच्यासमोर नवाजचा अभिनय झाकोळला गेला नाही. उलट त्याने आत्मविश्वासाने सहाय्यक कलाकाराची भूमिका पार पाडली. भविष्यात आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, तरी आपण तितक्याच सहजतेने अभिनय करू अशी नवाजला खात्री वाटते. आकाशाला हात लागूनही नवाजचे पाय आजही जमिनीवर टेकले आहेत. याचे उदाहरण म्हणजे, एवढा मोठा आणि महागडा अभिनेता होऊनही त्याला आजही आपल्या गावात होणाऱ्या ‘रामलीला’ नाटकांत रामाची भूमिका करण्याची इच्छा आहे आणि तसे करण्यात त्याला अजिबात कमीपणा वाटत नाही. उलट आपल्या मनात अभिनयाचे बीज रामलीलेमुळे पेरले गेले, अशी तो कबुली देतो.

विविध विषयांमुळे वादविवादांच्या भोवऱ्यात सापडणारा नवाज त्यातच अडकून बसला नाही, तर लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून स्वत:च्या कामावर लक्ष केंद्रित करत राहिला. ‘भगवान के भरोसे मत बैठो, का पता भगवान तुम्हारे भरोसे बैठा हो’ हा मांझी चित्रपटातील संवाद त्याने वैयक्तिक आयुष्यातही अमलात आणला. आता तर तो, वादळ अंगावर घेतोय, अर्थात बाळासाहेबांची भूमिका साकारतोय. ही भूमिका साकारताना मनावर दडपण असले, तरी ती साकारण्यासाठी बाळासाहेब मला आशीर्वाद देतील आणि मी त्यांच्या मायमराठीला सन्मानपूर्वक योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन, अशी भावना त्याने ‘ठाकरे’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला, त्या वेळेस व्यक्त केली. नवाजचा हा आत्मविश्वास पाहून त्याला त्याच्याच डायलॉगनुसार म्हणावेसे वाटते, ‘शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!’

प्रत्येक सर्वसामान्य तरुणाला असाध्य ते साध्य करण्याची प्रेरणा देणारी नवाजची यशोगाथा आहे. अपमानामुळे खचून न जाता आपल्या ध्येयाच्या दिशेने अथक प्रवास करण्याची तयारी असेल, तर तुम्हीही ‘नवाज’च काय, तर ‘नवाब’ बनू शकता, हे लक्षात घेत नवीन वर्षाचे आणि नव्या आव्हानांचे स्वागत करूया!