धन्य अजि दिन, झाले संतांचे दर्शन

>>ज्योत्स्ना गाडगीळ

स्टेशन गाठण्यासाठी नेहमीप्रमाणे मी शेअर रिक्षेकडे धाव घेतली. तेवढ्यात एक जण माझ्यापेक्षा अधिक वेगाने जाऊन रिक्षेत बसला. रिक्षा भरली आणि निघून गेली. नेहमीची ट्रेन मिस होणार ह्याच तीव्र दुःख बाळगत, नाराजीने मान खाली घालून मी पुढच्या रिक्षेकडे पावलं वळवली. तोच कानावर आवाज, ‘या माऊली…’ मान वर करून बघते, तो रिक्षेवाले काका वारकरी. पांढरा सदरा-पायजमा-टोपी, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर अबीर-चंदनाचा टिळा आणि सुरकुतलेल्या चेहऱ्यावर समाधानकारक हास्य!

मी रिक्षेत जाऊन बसले, तर कानावर भीमसेनी सूर, ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतसे’. क्षणात मन प्रसन्न झालं आणि चंद्रभागेवर जाऊन पोहोचलं. काकांनी रिक्षेत प्रति पंढरपूर तयार केलं होतं. विठ्ठल-रखुमाईची छबी, त्यावर वाहिलेला छोटासा तुळशीहार, आरशाच्या कानावर अडकवलेली सुगंधी उदबत्ती, आंब्याच्या पानांचं लोकरी तोरण, त्याला बांधलेल्या घंट्या, मंद सुरात लावलेली अभंगवाणी ह्या वातावरणामुळे आपण ऑफिसला जातोय, की पंढरपूरला हेच उमगत नव्हतं. शेअर रिक्षा असल्याने आणखी दोन प्रवासी येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.
काका रिक्षेबाहेर उभे होते. भीमसेनजी गात होते. रिक्षेत सुगंध दरवळत होता आणि मी पुढचे प्रवासी येण्याची वाट बघत होते. काकांचं लक्ष वेधत म्हटलं,
‘काका, वारीला नाही गेलात?’
‘यंदा नाही गेलो ताई.’
‘म्हणजे नेहेमी जाता?’
‘हो, या वर्षी लेकाने आजारपण अंगावर काढलंय. सुनेच्या हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू आहे. आमची बायको घरचं, नातवाचं सांभाळतेय, अशात मी कसा वारीला जाऊ?’
‘रुखरुख लागली असेल नं?’
‘नाही ताई, आपलं काम हीच आपली वारी, आपलं कार्यक्षेत्र हेच आपलं पंढरपूर आणि आपले प्रवासी हेच आपले विठ्ठल-रखुमाई. रोजची वारी घडतेच आहे, मग कशाला लागेल रुखरुख?’
‘खूप छान बोललात काका.’
‘तेवढंच काय ते येतं, हाहाहा! वारीला गेलो की कीर्तनं करतो. तुकोब्बा राय आणि माऊलीने घातलेले हे संस्कार आणि सर्व संतांनी दिलेलं हे विचारधन आहे.’
‘अरे वाह, कीर्तन करता? आपल्या इथे कीर्तन असेल तेव्हा सांगा, नक्की येईन.’
‘एकादशीला आहे, आपल्या नाक्यावरच्या विठोबाच्या देवळात, रात्री ८ वाजता.’
‘आठवणीने येईन. पण काका, तुमच्या मुलाला काय झालंय?’
‘कँसर झालाय, गुटखा खाऊन तोंड पोळलं, टाटा मध्ये उपचार घेतोय. त्याचे सोडा, पण सुनेचे हाल पाहावत नाहीत. डॉक्टर म्हणालेत, होईल बरा, पण सुधारला तर ठीक आहे, नाहीतर पुन्हा तेच! ताईss,
समर्थ म्हणतात-
जेणे परमार्थ ओळखीला, तेणे जन्म सार्थक केला,
येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे’
हे असे कुलक्षय करणारे दिवटे जन्माला येण्यापेक्षा निपुत्रिक राहिलेले बरे. कितीदा सांगितलं, ते विष खाऊ नको, पण ऐकलं नाही. आता त्याच्यापायी सुनेची ओढाताण होतेय. उपचार झाले की करतोच याला सरळ आणि आणतो भक्तीमार्गावर.’

‘काका, स्टेशन?’ असे म्हणत दोन मुलांनी आमच्या संवादात खंड पाडला. दोघं बसले, रिक्षा सुरू झाली. तोरणाच्या घंटा किंणकिणू लागल्या. काका गप्प झाले. भीमसेनजी गात राहिले. ‘धन्य अजि दिन झाले, संतांचे दर्शन…’ मुलाची फिकीर करायची सोडून सुनेची काळजी वाहणारा संत वृत्तीचा सासरा पाहिला, संत विचार ऐकले आणि वारीचा माहोल अनुभवला, तेव्हा रिक्षेतून उतरताना काकांचा निरोप घेत, मी ही भीमसेनजींच्या सुरात सूर मिसळले….
‘धन्य अजि दिन, झाले संतांचे दर्शन…’