पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आता बालआधार कार्ड

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सीमकार्डपासून ते अगदी गॅस जोडणीपर्यंत आता सगळ्यासाठीच आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. बँक खाते उघडतानाही आधारकार्डच लागते. इतकेच नव्हे तर आता मुलांच्या शाळा प्रवेशासाठी अगदी ज्युनीयर केजीसाठीही आधारकार्डसक्ती करण्यात आली आहे. पालकांच्या आधारकार्डच्या माध्यमातून लहानग्यांचे आधारकार्ड काढले जाते. पण,आता लहानग्यांसाठी वेगळे बालआधार कार्ड देण्यात येणार आहे.

५ वर्षांखालील बालकांना निळ्या रंगाचे आधारकार्ड मिळेल. बालआधारकार्डसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ते स्पष्ट केले आहे. त्यानुसार मुलाच्या शाळेचे ओळखपत्र हे आधारकार्डच्या नावनोंदणीसाठी चालू शकेल असे युआयडीएआयने सांगितले आहे.

बायोमेट्रिक माहितीची आवश्यकता नाही
एरव्ही आधारकार्डसाठी बायोमेट्रीक माहिती आवश्यक असते. पण, बालआधार कार्डच्या बाबतीत त्याची आवश्यकता नसेल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, मूल जेव्हा वयाची ५ वर्षे पूर्ण करील तेव्हा त्याने सामान्य आधारकार्डसाठी आवश्यक असणारी बायोमेट्रिक चाचणी करणे अनिवार्य असेल. ही प्रक्रिया मोफत होणार असून पालक आपल्या पाल्याची घराजवळच्या आधारकार्ड केंद्रात ही चाचणी करू शकतील. असे यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे.

यूआयडीएने ट्वीटरवर निळ्या रंगाच्या आधारकार्डचे इन्फोग्राफिक्स ट्विटरवर टाकले आहेत.
५ वर्षांच्या आतील मुलांना आधारकार्ड असणे सक्तीचे नसले तरीही परदेशातील शालेय उपक्रमांसाठी, शासकीय शिष्यवृत्तीसाठी त्याची आवश्यकता असते.
मूल ५ वर्षाचे झाल्यावर मात्र हे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच हाताची बोटे, डोळे, चेहरा इत्यादींची बायोमेट्रीक चाचणी करून घेणे सक्तीचे असेल.