आगीशी संबंधित पुरावे आणून द्यावेत, मुंबई महापालिकेचे लोकांना आवाहन

सामना प्रतिनिधी । मुंबई

कमला मिल आग प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे, व्हिडीओ, फोटो किंवा काहीही पुरावे असल्याचे त्यांनी ते पालिका आयुक्तांकडे सादर करावेत, असे जाहीर आवाहन पालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे. कमला मिल प्रकरणाच्या चौकशी अहवालासाठी या पुराव्यांचा वापर केला जाणार आहे. पालिका प्रशासनातर्फे या पद्धतीने प्रथमच जाहिरात देऊन मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीमध्ये १४ जणांचा बळी गेला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीचा निकाल १५ दिवसांत सादर करावा लागणार आहे. या चौकशी अहवालात सर्व बाजू पुढे याकरिता यामुळे पालिका आयुक्तांनी जाहीर आवाहन केले आहे.

८ जानेवारीला पालिका मुख्यालयात पालिका आयुक्तांनी त्याकरिता खास वेळ राखून ठेवली आहे. तसेच ज्यांना आपली ओळख गुप्त ठेवायची असेल अशा नागरिकांना फोनवरून किंवा mc.enquiry.kamala.gmail.com
ई-मेलवरूनही आपल्याकडील पुरावे सादर करता येणार आहेत.

इथे सादर करायचे पुरावे
आगीच्या घटनेशी संबंधित प्रत्यक्ष पुरावे, या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांचे जबाब, जखमींचे म्हणणे या सगळय़ाची नोंद या चौकशी अहवालात घेतली जाणार आहे. त्याचबरोबर कमला मिल परिसरात काम करणारे विविध कर्मचारी, प्रत्यक्षदर्शींनाही आपले म्हणणे मांडता येणार आहे. ज्यांच्याकडे आगीसंबंधी अशी काही माहिती असेल त्यांना पालिका आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून आपले म्हणणे मांडता येणार आहे.