बजेट रिऍलिस्टिक हवे; उगाच आकडा ‘फुगवू’ नका!

सामना ऑनलाईन, मुंबई

महापालिकेच्या अनेक कामांना राज्य आणि केंद्र सरकारची मंजुरी मिळत नसल्याने ही कामे रखडतात. त्यामुळे अर्थसंकल्पात तरतूद केलेला कोट्यवधीचा निधी अखर्चित राहिल्याचे दिसते. परिणामी अर्थसंकल्पाचा ‘आकडा’ फुगत असल्यामुळे महापालिकेवर विकासकामांवर निधी खर्च करीत नसल्याचा नाहक आरोप केला जातो. त्यामुळे ज्या कामांची प्रत्यक्षात सुरुवात होत नसेल, तर त्यासाठी तरतूद केलेल्या निधीची उचल करू नये आणि अर्थसंकल्पाचा आकडा नाहक ‘फुगवू’ नका, असे लेखी निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आयुक्त अजोय मेहता यांना दिले आहेत.

मुंबई सागरी मार्ग, गारगाई-पिंजाळ यांसारखे महत्वाचे प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाकडून तांत्रिक परवानग्या मिळाल्या नसल्याने रखडले आहेत. मात्र अशा प्रकल्पांसाठीचा कोट्यवधीचा निधी महापालिकेच्या अर्थसंकल्पात मांडला जात असल्यामुळे अर्थसंकल्पील वर्षात निधी शेवटपर्यंत पडून राहिल्याचे दिसते. या निधीचा वापर होत नसल्याने हा निधी पुन्हा पुढच्या अर्थसंकल्पात येत राहिल्यामुळे विनाकारण अर्थसंकल्पाचा आकडा फुगत जातो. त्यामुळे प्रस्तावित कामासाठी तरतूद जरी केली असली तरी प्रत्यक्ष कामास सुरुवात होत नसेल तर त्यासाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीची उचल करण्यात येऊ नये. जेणेकरून अर्थसंकल्पाचा आकडा विनाकारण फुगणार नाही आणि अर्थव्यवस्थेवर नियंत्रण राहील असे महापौर महाडेश्वर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

विकासकामांच्या खर्चाची माहिती मुंबईकरांना मिळायलाच हवी

मुंबईकरांसाठी महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या कामांपैकी कुठल्या कामासाठी किती निधी खर्च होतो याची माहिती प्रत्येक मुंबईकरांना कळणे गरजेचे असल्याचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी म्हटले आहे. यासाठी प्रत्येक विकासकामासाठी योग्य निधीची तरतूद व्हायला हवी. त्यामुळे हा अर्थसंकल्प वास्तवदर्शी मांडावा अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात येणार असल्याचेही यशवंत जाधव म्हणाले.

महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी पुरेशा निधीची तरतूद केल्यामुळे मुंबईकरांसाठी उत्तमोत्तम योजना मिळतील. तसेच मुंबईच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल. मात्र हा अर्थसंकल्प वास्तवदर्शी असला पाहिजे. – महापौर