निवडणुकीला दीड वर्ष झाले तरी, इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना मानधन नाही

सामना प्रतिनिधी, मुंबई

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन दीड वर्ष पूर्ण झाले तरी इलेक्शन डय़ुटीवर जुंपलेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप त्यांचे हक्काचे मानधन मिळाले नाही. इलेक्शन डय़ुटीवरील तब्बल 43 हजार कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाच्या सुस्त कारभाराचा फटका बसला आहे. पालिकेबाहेरील कर्मचाऱयांना आपले मानधन मिळालेले असले तरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मात्र मानधन मिळू शकलेले नाही.

गेल्या वर्षी सन 2017 मध्ये 21 फेब्रुवारीला पालिकेची निवडणूक पार पडली. या कामासाठी पालिकेच्या विविध विभागांतील तब्बल 43 हजार कर्मचारी विविध विभागांमध्ये इलेक्शन ड्युटीवर पाठवण्यात आले होते. मतदान एक दिवसाचे असले तरी प्रत्यक्षात इलेक्शन डय़ुटीवर पाठवण्यात आलेल्यांना दीड-दोन महिने राबवून घेतले जात असते. इलेक्शन ड्युटीवर पाठवताना कर्मचाऱ्यांचे म्हणणे त्यांच्या सोयी-गैरसोयींचा विचार केला जात नाही. मात्र त्यांचे मानधन देताना इतकी टाळाटाळ का केली जाते, असा सवाल एका कर्मचाऱ्याने केला आहे. निवडणूक पार पडल्यापासून तीन महिन्यांत मानधन दिले पाहिजे. असे असताना पुढील महिन्यात निवडणुकीला एक वर्ष पूर्ण होईल त्याच्या आत तरी हे मानधन मिळावे अशी अपेक्षा या कर्मचाऱयाने व्यक्त केली आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्याने मानधन रखडले असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले असून मानधन देण्याबाबतचा प्रस्ताव लेखा विभाग (वित्त) यांच्याकडे सहा महिन्यांपूर्वीच पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले.

summary- BMC did not paid fees of employees of election duty