खड्डे एमएमआरडीएचे… भुर्दंडमहापालिकेला

सामना प्रतिनिधी । मुंबई

वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो रेल्वे सुरू होऊन अनेक वर्षे उलटली. पण त्या मेट्रोसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) खोदून ठेवलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा भुर्दंड मात्र मुंबईकरांवरच पडला आहे. महानगरपालिकेला या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत दीडशे कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.

वर्सोवा ते घाटकोपर या मेट्रो-1 प्रकल्पासाठी एमएमआरडीएने अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक आणि साकीनाका जंक्शन येथे 4.2 किलोमीटरच्या रस्त्यांवर खोदकाम केले होते. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएने रस्त्यांची दुरुस्ती न करता ते महापालिकेच्या ताब्यात दिले. अखेर मुंबईकरांच्या हितासाठी महानगरपालिकेलाच ते रस्ते दुरुस्त करावे लागले. त्याची भरपाई करून देण्यास मात्र एमएमआरडीए तयार नसल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

एमएमआरडीएने खराब केलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेला खर्च तर करावा लागतच आहे, पण दुरुस्तीच्या कामासाठी वाहतूक विभागाची सतत परवानगीही घ्यावी लागत आहे. अंधेरी स्थानक ते साकीनाका जंक्शनपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठीच 100 कोटी रुपये खर्च झाला. रस्त्यांबरोबर त्याखालील ड्रेनेज आणि सिव्हरेज लाइन्सचेही एमएमआरडीएने नुकसान केले. त्यांच्या दुरुस्तीसाठी आणखी 50 कोटी रुपये खर्च पालिकेला झाला. अंधेरी पश्चिमेच्या जे. पी. रोडवरील दुरुस्तीसाठीही काही खर्च करावा लागला. अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील दुरुस्ती अद्याप बाकी असल्याची माहिती पालिका अधिकाऱयांनी दिली.

मेट्रोसाठी खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी झालेल्या खर्चाबाबत गेली तीन वर्षे पालिकेकडून एमएमआरडीएला लेखी कळवले जात आहे, परंतु त्यांच्याकडून गेल्या तीन वर्षांत एक रुपयाही देण्यात आलेला नाही. एमएमआरडीएचे अधिकारी तर यावर बोलायलाही तयार नाहीत. मुंबईत आणखी अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. हाच अनुभव तिथेही येण्याची शक्यता नाकारता येत नाही.