महापालिकेचा धडाका वाढला; हॉटेलवाल्यांना धडकी भरली

चेंबुर येथील मार्ग क्र. २० वरील एका दुकानाने अनधिकृत विस्तार केला होता. तो पालिकेतर्फे उद्ध्वस्त करण्यात आला.

सामना ऑनलाईन,मुंबई

‘कमला मिल’ अग्निकांडात १४  जणांचा बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने सलग दुसऱया दिवशी बेकायदा हॉटेल, रेस्टॉरंट, पबवर धडक कारवाई केली. यामध्ये तब्बल ६१६ हॉटेल्स, रेस्टॉरंटवर धाडी टाकून ३५७ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. विशेष म्हणजे आज रविवारची सुट्टी असताना पालिका आधिकाऱयांनी रस्त्यावर उतरून ही कारवाई केली.  ऐन ‘थर्टी फर्स्ट’ दिवशी कारवाई झाल्याने हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला.

कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या दुर्घटनेनंतर पालिकेने बेकायदेशीर हॉटेल्सकर कारकाईचा धडाका सुरू केला आहे. घटनेनंतर पहिल्याच दिवशी शनिवारी तब्बल ३१४ हॉटेल्स, जिमखाने आणि पब्जची अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली होती. रविवारी सकाळपासूनच जेसीबी, शेकडो कर्मचारी आणि पोलिसांच्या फौजफाटय़ासह कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईत अनेक बडय़ा हॉटेल्स, रेस्टॉरंटचा समावेश असल्यामुळे व्यावसायिकांची धावपळ उडाली. यामध्ये अनेक ठिकाणी तोडण्यात आलेल्या बेकायदा बांधकामाच्या डेब्रिजमुळे व्यावसायिकांचा थर्टी फर्स्ट मात्र खराब झाला. या कारकाईत प्रत्येक वॉर्डमधील सहाय्यक आयुक्त रविवारची सुट्टी रद्द करून हजर होते. याशिवाय पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन, किजय सिंघल आणि आबासाहेब जऱहाड हेदेखील कारकाईच्या ठिकाणी उपस्थित होते.

स्पेशल टीमकडून कारवाई

कारवाईसाठी २४ विभागांमध्ये प्रत्येकी तीन टीम तयार करण्यात आल्या होत्या. यामध्ये इमारत व कारखाने, अतिक्रमण निर्मूलन, सार्वजनिक आरोग्य खात्याचे कर्मचारी-अधिकारी सहभागी झाले. या कारवाईत अग्निशमन दलाचे अधिकारीही सहभागी झाले होते.

 संपूर्ण ‘सफाई’ होईपर्यंत कारवाई

व्यावसायिकांच्या बेजबाबदारपणामुळे नाहक बळी जात असल्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पालिकेमार्फत ठोस पावले उचलण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीच्या दिवशीही स्पेशल टीम तयार करून मुंबईभरात कारवाई करण्यात आली. आगामी काळात दुर्घटना टाळण्यासाठी संपूर्ण मुंबई जोपर्यंत बेकायदेशीर बांधकाममुक्त होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. दुर्घटनेनंतर होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून  वागले पाहिजे. याबाबत जनजागृती करण्यरासाठी सोमवारी पालिकेमार्फत मुंबईकरांना आवाहनही करण्यात येणार आहे.

 हुक्का पार्लरमधील साहित्य जप्त

‘एल’ विभागात २२ ठिकाणी, एस व आर उत्तर विभागात प्रत्येकी तीन ठिकाणी, डी विभागात प्रत्येक एका ठिकाणावर ही कारवाई करण्यात आली. ‘इ’ विभागात शिवदास चापली रोड येथील बेकायदा हुक्का पार्लरवरदेखील कारवाई करण्यात आली. यामध्ये ६० हुक्का आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

 या ठिकाणी झाली कारवाई

रविवारच्या कारकाईत कमला मिल, रघुकंशी मिल आणि पेनिनसुला बिझनेस पार्क, हॉटेल शिकसागर, हॉटेल बालाजी, बालाजी कॉर्नर, गुरुकृपा हॉटेल, मिलन ज्यूस ऍण्ड स्नॅक्स आदी हॉटेल्समधील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. याशिवाय गोरेगाक पूर्क येथील लकी हॉटेल, चेंबूर येथील खाना खजाना, अंधेरीतील बॉम्बे ठेका, एल कॉर्डातील हॉटेल इन हॉलिडे, कर्सेक्यातील हॉटेल मढ, साकीनाक्यातील बार स्टॉक एक्स्चेंज आणि मालाडमधील मंत्रा हॉटेलमधील बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. महालक्ष्मी मंदिराजकळील कॅफे फुमो या रुफटॉप हॉटेलकरील छतही पालिकेने तोडून टाकले.

आयुक्तांचा नवीन वर्षाचा संकल्प

संपूर्ण मुंबई जोपर्यंत बेकायदेशीर बांधकाममुक्त होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे. संपूर्ण ‘सफाई’ करणारच!-अजोय मेहता

आरोपींना मदत करणाऱया काका-पुतण्याला अटक

‘वन अबाव्ह’ हॉटेल अग्नितांडव प्रकरणातील आरोपी रितेश आणि जिगर हे संघवी बंधू अद्यापि पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. मात्र या आरोपी बंधूंना आसरा देऊन त्यांना पसार होण्यास मदत करणाऱया काका-पुतण्याला भायखळा पोलिसांनी अटक केली आहे. राकेश संघवी (४६) आणि आदित्य संघवी (२९) अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी महेंद्र संघवी (५२) यालाही ताब्यात घेतले आहे.

माझगाव येथील चैत्य टॉवरमध्ये रितेश, जिगर तसेच राकेश, आदित्य आणि महेंद्र हे संघवी कुटुंब राहते. रितेश आणि जिगरविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच ते भूमिगत झाले. पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्याचवेळी राकेश, आदित्य आणि महेंद्र यांनी त्या दोघांना पसार होण्यास मदत केली. हा प्रकार कळताच भायखळा पोलीस ठाण्यात राकेश, आदित्य आणि महेंद्र यांच्या विरोधात भादंवि कलम २१६, १८७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भायखळा पोलिसांनी चैत्य टॉवर गाठून राकेश, महेंद्र आणि आदित्य या तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान, राकेश आणि महेंद्र या काका-पुतण्याला अटक करून आज किल्ला कोर्टात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. महेंद्रला रात्री उशिरापर्यंत अटक झाली नव्हती. आदित्य हा रितेश आणि जिगर यांचा चुलतभाऊ असून महेंद्र आणि राकेश हे काका आहेत.