पूल दुरुस्तीसाठी महापालिकेने ७ वर्षांपूर्वी रेल्वेला दिले २३ लाख रुपये

सामना प्रतिनिधी । मुंबई

एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेला अद्याप वर्ष होत नाही तोच अंधेरीच्या गोखले पुलाच्या दुर्घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या बेदरकारपणाचे आणखी एक उदाहरण मुंबईकरांना पाहायला मिळाले. गोखले पुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाने सन २०१०मध्ये पालिकेकडून २३ लाख रुपये घेतले. मात्र गेल्या सात वर्षांत या पुलासाठी एकही रुपयाचा निधी रेल्वेने मागितलेला नाही आणि पुलाची देखभाल-दुरुस्तीही केलेली नाही, असे उघडकीस आले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या या माहितीमुळे रेल्वेचेच पितळ उघडे पडले आहे.

अंधेरी स्थानकाजवळ आज कोसळलेला गोखले पूल हा गेल्या सात वर्षांपासून देखभालीशिवाय रामभरोसे उभा होता, असे उघडकीस आले आहे. सन २०१०मध्ये या पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वेने काढले होते. त्याकरिता पालिकेकडे २३ लाख रुपयांची मागणी केली होती. या मागणीनुसार पालिकेने मार्च २०१०मध्ये २१.२३ लाख आणि नंतर मार्च २०११मध्ये १.७८ लाख रुपये पश्चिम रेल्वेला दिले होते, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिली आहे. मात्र सन २०११नंतर या पुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वेने कोणतीही मागणी केलेली नाही.

देखभालीसाठी निधी

सुरक्षिततेच्या कारणास्तव रेल्वेच्या पादचारी पुलाच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी झाल्यास ती तातडीने दिली जाते. रेल्वे प्रशासनाने जेव्हा जेव्हा पादचारी पुलाच्या दुरुस्ती व देखभालीसाठी निधीची मागणी केली तेव्हा तेव्हा निधी देण्यात आलेला आहे.
– विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त

फक्त वरची डागडुजी पालिकेची पादचारी पुलाच्या वरील पृष्ठभागाची

दुरुस्ती करण्याचा पालिकेला अधिकार आहे. मात्र पुलाच्या देखभालीची आणि पुलाच्या स्ट्रक्चरल दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेची असते.
– शीतलाप्रसाद कोरी, प्रमुख अभियंता, पूल विभाग, महापालिका

राजकारण करणाऱ्यांचे तोंड बंद

दरम्यान, हा पूल पालिकेच्या मालकीचाच असून पालिकेचीच जबाबदारी होती असे म्हणणाऱयांचे तोंड अधिकाऱयांच्या माहितीमुळे बंद झाले आहे. रेल्वेने सन 2010मध्ये पालिकेकडे निधीची मागणी करणारे पत्र लिहिले होते. यावरून या पुलाच्या दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेची होती हे सिद्ध होत असल्याचेही मत एका अधिकाऱयाने व्यक्त केले आहे.

पूल सकाळी ११ वाजता कोसळला असता तर…

मंगळवारी कोसळलेल्या अंधेरीच्या गोखले पुलाच्या नेमके खाली हे शिधावाटप कार्यालय आहे. तिथे ३० अधिकारी-कर्मचारी असून रेशनकार्डधारकांची रोजच गर्दी असते. तो पूल सकाळी ७.३० वाजेऐवजी ११ वाजता कोसळला असता तर असंख्य जिवांचा बळी गेला असता.

अन्यथा पालिकेवर ट्रेसपासिंगचा गुन्हा

रेल्वेच्या हद्दीतील पुलाच्या दुरुस्तीचे काम नियमानुसार पालिकेला करता येत नाही. तसे केल्यास पालिकेवर ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहितीही अधिकाऱयांनी दिली आहे.