शिवसेनेची वचनपूर्ती! पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा प्रवास ‘बेस्ट’

सामना ऑनलाईन । मुंबई

महापालिकेच्या ३ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांना आता मोफत ‘बेस्ट’ बस पास मिळणार आहे. १ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महापौर बंगल्यावर होणार आहे. या उपक्रमात प्राथमिक तत्त्वावर सात हजार विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यात येणार आहेत. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्याचे आश्वासन शिवसेनेने पूर्ण केल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई महापालिकेच्या सध्या ११९५ शाळा आहेत. यामध्ये पहिली ते दहावीच्या वर्गांमध्ये ३ लाख ३५ हजार ९३७ विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे गोरगरीब कुटुंबांतील असतात. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्याचे आश्वासन शिवसेनेच्या वचननाम्यात देण्यात आले होते. त्यानुसार शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना मार्गी लागली आहे. यानुसार १ नोव्हेंबरपासून ‘बेस्ट’च्या २५ आगारांमधून ६९०३ विद्यार्थ्यांना मोफत ‘बेस्ट’ बस पास देण्यात येणार आहे. या योजनेच्या शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ही योजना सुरू करण्यासाठी शिक्षण उपायुक्त मिलीन सावंत, शिक्षणाधिकारी महेश पालकर यांचे सहकार्य लाभल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी सांगितले.

अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद
पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यासाठी अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये ‘बेस्ट’कडून ज्या प्रमाणात हा विद्यार्थ्यांना मोफत पास देण्यावर खर्च करण्यात होईल त्या प्रमाणात रक्कम दिली जाणार आहे. या योजनेसाठी येणाऱया खर्चाची पूर्तता महापालिकेच्या शिक्षण खात्यामार्फत केली जाणार असल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी सांगितले.