आधीच्या निधीचा हिशेब द्या! पालिकेने रेल्वेला सुनावले

सामना प्रतिनिधी । मुंबई

एल्फिन्स्टन पुलावर २९ सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वेच्या पादचारी पुलांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वेने पादचारी पुलांच्या व उड्डाणपुलांच्या दुरुस्तीसाठी आणि पुनर्बांधणीसाठी पालिकेकडे तब्बल सुमारे २६० कोटींची मागणी केली आहे. यापूर्वी दिलेल्या निधीचा आधी हिशेब द्या आणि केलेल्या कामाचा अहवाल सादर करा असे पालिका प्रशासनाने रेल्वेला सुनावले आहे.

रेल्वे ट्रकच्या आजूबाजूला असलेल्या नाल्यांच्या सफाईसाठी पालिका रेल्वेला निधी देत असते, मात्र नालेसफाईचा अहवाल रेल्वेकडून कधीही दिला जात नाही. अतिवृष्टीच्या काळातही रेल्वेच्या कंट्रोल रूमकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा ठपका आपत्कालीन विभागाने नुकताच ठेवला होता. तशीच गत रेल्वेच्या पादचारी पुलांच्या दुरुस्तीची झाली आहे.

रिगर्डरिंगसाठी प्रस्ताव आणा

रेल्वेने रिगर्डरिंगसाठीही निधी मागितला आहे. मात्र रिगर्डरिंगमुळे फारसा उपयोग होणार नसल्यामुळे त्याबाबतचा प्रस्ताव आणावा, असे निर्देश रेल्वे प्रशासनाला पालिका प्रशासनाने दिले आहेत.