गणेशोत्सव मंडळांना बाप्पा पावला १५ जुलैपासून ऑनलाइन परवानग्या

सामना प्रतिनिधी ,मुंबई

गणपती मंडपात स्थानापन्न झाले तरी अनेकदा मंडपांना पालिका प्रशासनाकडून परवानग्या मिळण्याचे काम सुरूच असते. यंदा मात्र पालिका प्रशासनाने मंडपांना परवानग्या देण्याचे काम १५ जुलैपासूनच सुरू करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे यावेळी मंडळांना मंडप उभारण्यासाठीच्या परवानग्या ऑनलाइन मिळू शकणार आहेत. त्यामुळे यंदा गणेश मंडळांच्या मागचे विघ्न संपणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या परवानग्या यावर्षीपासून ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहेत. रस्ता किंवा वाहतूक अडवणार्या मंडपांना परवानग्या न देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मंडळांना परवानग्यांसाठी पालिकेच्या वॉर्ड कार्यालयात खेटे घालावे लागतात. गणेशोत्सव सुरू व्हायला दहा दिवस असताना ही परवानग्या देण्याची पद्धत सुरू केली जाते. त्यामुळे अनेक मंडपांना गणपती मंडपात आले आणि गणेशोत्सव सुरू झाला तरी परवानग्या मिळालेल्या नसतात. त्यातच परवानगी नसेल तर मंडप उभारता येणार नाही असे परिपत्रक पालिका प्रशासनाने काढले होते, मात्र गणेशोत्सवाची तयारी ही दोन-तीन महिने आधीपासून सुरू होत असते. त्यामुळे यावर तोडगा काढवा या मागणीसाठी गणेशोत्सव समन्वय समितीने पालिका अधिकाऱयाची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त नरेंद्र बर्डे, विनोद घोसाळकर, समन्वय समितीचे नरेश दहीबावकर, गिरीश वालावलकर, कुंदन आगासकर, पपी पाटील, ऍड. एस. एस. पवार आदी उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन परवानगी देण्यासाठी महापालिकेच्या विभाग स्तरावरील अधिकाऱयांना सुयोग्य माहिती व्हावी, यादृष्टीने महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे लवकरच विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच मंडपांना परवानगी देताना कायद्याचे पालन करण्यासाठी कायदेविषयक बाबींचेही प्रशिक्षण सत्र महापालिकेच्या विधी खात्याद्वारे आयोजित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

असे करा अर्ज

१५ जुलैपासून सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना परवानग्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज देताना गणेशोत्सव मंडपाचा आकार, रस्त्यासंबंधीच्या बाबी इत्यादींबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या अटींसापेक्ष या परवानग्या देण्यात येणार आहेत. वाहतूक पोलीस, स्थानिक पोलिसांची ‘ना-हरकत’ मिळताच मंडळांना महापालिकेद्वारे परवानगी देण्यात येणार आहे.

तीन दिवसांत परवानगी हातात

परवानगी देण्याचे काम ऑनलाइन सुरू केल्यामुळे मंडळांचे काम सोपे होणार आहे. तसेच अर्ज केल्यापासून तीन दिवसांत परवानग्या मिळणार असल्याचे आश्वासन या बैठकीत अधिकाऱयांनी दिल्याची माहिती दहीबावकर यांनी दिली. त्यामुळे मंडळांना १५ जुलैपासून अर्ज सादर करावे, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहीबावकर यांनी केले आहे.