मुंबई महापालिका हागणदारीमुक्त

मुंबई — महापालिका हागणदारीमुक्त झाल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. तसे पत्रच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी राज्याचे नगरविकास खाते व शहरी भागासाठीचे ‘स्वच्छ भारत’ अभियानाचे राज्याचे संचालक यांना लिहून कळविले आहे.

ऑक्टोबर २०१४ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार पालिकेच्या २४ विभागांमध्ये ११८ ठिकाणी हागणदारी होत असल्याचे निदर्शनास आले होते. स्वच्छ भारत अभियानातील निकषांनुसार हागणदारी होणार्‍या भागात ५०० मीटरच्या परिसरात सर्वत्र शौचालये उपलब्ध करून देणे बंधनकारक होते. तशी ती आता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आता हे सर्व विभाग ‘हागणदारीमुक्त’ झालेले असून जेथे शौचालयांचे बांधकाम सुरू आहे तेथे फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पश्‍चिम व मध्य रेल्वेच्या रुळालगत होणारी हागणदारी थांबविण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दोन्ही विभागांच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून या भागात आवश्यक असणारी शौचालये उभारण्यासाठी सहकार्य करण्याचीही विनंती केली आहे.

मुंबईत आतापर्यंत १ हजार ६४१ आसनांची नवीन शौचालये बांधण्यात आली असून ३ हजार ८७७ आसनांच्या शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. यापूर्वी महापालिका क्षेत्रात ८ हजार ४१५ शौचालयांमध्ये सुमारे ८० हजार आसने आहेत. जेथे शौचालयांचे बांधकाम सुरू आहे किंवा काही अडचणींमुळे शौचालयाचे बांधकाम करता आले नाही अशा ठिकाणी सुमारे ८०० आसनांची फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संबंधितांनी या शौचालयांचा वापर करावा यासाठी पालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्यक्ष हागणदारीच्या ठिकाणी संबंधितांना शौचालयांचा वापर करण्याबाबत विनंती करण्यासोबतच या भागात होर्डिंग्स, पोस्टर, बॅनर्सही उभे करण्यात आले आहेत. याशिवाय या भागात प्रबोधनासाठी पथनाट्यांचे प्रयोगही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. हागणदारी जेथे होत होती त्या भागात ‘क्लीनअप मार्शल’ची नियुक्ती करण्यात आली आहे. ते संबंधितांना त्या भागात असलेल्या शौचालयाचा वापर करावा अशी विनंती करीत आहेत.