लव्हग्रोव्ह येथील हस्तकला केंद्राची जागा पालिका ताब्यात घेणार

bmc-building-mumbai

सामना ऑनलाईन । मुंबई

लव्हग्रोव्ह येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या आवारातील 2100 चौ.मी. जागा ताब्यात घेण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. मुंबई कला व हस्तकला केंद्रासाठी ही जागा देण्यात आली होती. मात्र गेल्या 12 वर्षांत जागेचा वापर करण्यात केंद्राच्या व्यवस्थापकीय विश्वस्तांना अपयश आल्यामुळे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेने सन 2006 मध्ये लव्हग्रोव्ह सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या आवारातील 2100 चौ.मी. जमीन मुंबई कला व हस्तकला केंद्रासाठी दिली. यामध्ये वाढ करून 2686 चौ.मी. जागेत कला केंद्रासाठी दोन इमारती बांधण्यात आल्या. यासाठी तब्बल चार कोटी 90 लाख रुपये खर्च करण्यात आले. बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्स अण्ड इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक हे मुंबई कला व हस्तकला केंद्राचे व्यवस्थापकीय विश्वस्त असतात. परंतु त्यांनी कला केंद्रासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे कला केंद्रासाठी जमीन देण्याचा निर्णय रद्द करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.