महालक्ष्मीमध्ये उभे राहणार महापालिकेचे प्राणी रुग्णालय

3

इंद्रायणी नार्वेकरकरंबे । मुंबई

मुंबईकरांना स्वस्तात आरोग्य सेवा देणारी पालिका यापुढे प्राण्यांसाठीही स्वस्तात उपचार देऊ शकणार आहे. पालिकेचे पहिलेवहिले प्राण्यांसाठीचे रुग्णालय लवकच महालक्ष्मीच्या धोबीघाटाजवळ उभारले जाणार आहे. त्यामुळे यापुढे प्राणीप्रेमींना मुक्या प्राण्यांसाठी परळच्या बैलघोडा रुग्णालयाला मोठा आणि स्वस्त पर्याय मिळू शकणार आहे.

मुंबईमध्ये लोकसंख्येबरोबरच प्राण्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पाळीव प्राण्यांबरोबरच भटक्या जनावरांचीही संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. पाळीव प्राण्यांना आजार झाले तर त्यांना महागडा खासगी दवाखान्यात, रुग्णालयात जाऊन उपचार मिळू शकतात. मात्र गरीब घरातील लोकांना हा खर्च परवडणारा नसतो. तसेच मोकाट, भटक्या जनावरांना आपले आजार अंगावरच काढावे लागतात. त्यामुळे पालिकेने स्वतःचे प्राण्यांचे रुग्णालय सुरू करण्याचे ठरवले आहे. त्याकरिता पालिका प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांकडून स्वारस्याची अभिरुची, अर्थात या विषयातील संस्थांना सहभागी करून घेण्याचे ठरवले आहे. त्याबाबतची जाहिरात नुकतीच वर्तमानपत्रांत देण्यात आली आहे.

प्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या आजारांसाठी प्रयोगशाळा

प्राण्यांच्या रोगांवर उपचार करण्यासाठी सध्या महापालिकेचा एक पशुवैद्यकीय दवाखाना असून तो खार परिसरात आहे. हा दवाखाना अद्ययावत करून प्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या रोगांच्या निदानाकरिता प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. साधारणपणे माणसाला होणाऱ्या आजारांपैकी ३०० हून अधिक आजार हे पशूचे निकृष्ट दर्जाचे मांस, निकृष्ट दर्जाचे प्राणीजन्य पदार्थ, प्राण्यांचे मलमूत्र इत्यादींपासून माणसाला होतात. प्राण्यांपासून माणसाला होणाऱया आजारांना ‘झूनॉटिक डिसिजेस’ असे म्हटले जाते. यामध्ये लेप्टोस्पायरोसिस, रेबिज, ऍन्थ्रॅक्स, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू यासारख्या आजारांचा समावेश होतो.

अर्थसंकल्पात प्राण्यांसाठीही तरतूद

नुकत्याच मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात पालिकेने प्राण्यांसाठीही विशेष आर्थिक तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात पशुवैद्यकीय व पशू आरोग्यसंबंधित बाबींचा विशेष विचार करण्यात आला आहे. पाळीव प्राणी व भटकी जनावरे यांच्या आरोग्यासाठी परिमंडळीय स्तरावर पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याकरिता सात पशुवैद्यक डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. प्राण्यांसाठी दवाखाना, रुग्णालय, पशुवैद्यकांच्या नियुक्त्या या सर्व बाबींसाठी रुपये १४ कोटी ५५ लाखांची प्रारंभिक तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

धोबीघाटाजवळची जागा निश्चित

प्राण्यांच्या रुग्णालयासाठी महालक्ष्मी येथील धोबीघाटाजवळची जागा निश्चित करण्यात आली आहे. प्राणीप्रेमी संस्थांच्या मदतीने खासगी सार्वजनिक सहभागातून हे रुग्णालय चालवले जाणार असल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱयांनी दिली. या रुग्णालयामुळे प्राण्यांमधील विविध आजार, अपंगत्व यावर उपचार होऊ शकणार आहेत.