पालिकेच्या 66 शाळांचा कायापालट

सामना प्रतिनिधी । मुंबई

कुबट वर्ग, ओल लागलेल्या भिंती, अंधारलेल्या खोल्या, दुर्दशा झालेले शौचालय हे पालिका शाळांमधील दृश्य आता बदलू लागले आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेच्या तब्बल 66 शाळांनी कात टाकली आहे. यात चार शाळांची पुनर्बांधणी करण्यात आली आहे तर 62 शाळांमध्ये मोठय़ा प्रमाणात दुरुस्ती करून शाळांचा कायापालट करण्यात आला आहे. पिवळ्या आणि तपकिरी रंगांची रंगसंगती वापरून पालिकेच्या शाळांनाही नवी ओळख या दुरुस्तीदरम्यान देण्यात आली आहे.

पालिकेच्या शाळांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमधील शिक्षण अधिक आनंददायी व्हावे, तसेच मनपा शाळा इमारतींची स्वतंत्र ओळखदेखील तयार व्हावी म्हणून गेल्या तीन वर्षांपासून नियोजनबद्ध पद्धतीने शाळांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्याचअंतर्गत पालिकेच्या अनेक शाळांची मोठी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत तर काही इमारतींचे पुनर्बांधकाम करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये चार शाळांचे पुनर्बांधकाम पूर्ण झाले असून 62 शाळांची मोठी दुरुस्तीकामे देखील पूर्ण होऊन या इमारती आता विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजू लागल्या आहेत.

पुनर्बांधणी आरटीई नियमानुसार
शाळांचे पुनर्बांधकाम करताना, तसेच मोठी दुरुस्तीकामे हाती घेताना ‘शिक्षण हक्क कायदा’ (आरटीई) मधील विविध तरतुदींची अंमलबजावणी करण्याची काळजीदेखील घेण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी-विद्याार्ंथनींसाठी स्वतंत्र शौचालये, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र शौचालये, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन शाळेच्या परिसरात ‘रॅम्प’सारख्या आवश्यक त्या सोयीसुविधा, साधारणपणे प्रत्येक 40 विद्यार्थ्यांमागे एक शौचकूप, आवश्यकतेनुसार अतिरिक्त वर्गखोली इत्यादी बाबींचा समावेश आहे. 62 इमारतींच्या मोठय़ा दुरुस्तीकामांसाठी महापालिकेने आर्थिक वर्ष 2017-18 च्या तरतुदीमधून रुपये 96 कोटी 23 लाख एवढा खर्च केला आहे.

सर्वाधिक इमारती चेंबूर, कुर्ल्यातील
चेंबूर स्टेशनजवळील पालिकेची शाळा असो, कुर्ल्यातील संघर्ष नगरमधील मनपा शाळा किंवा कुरार गावातील मनपा शाळा गेल्या काही दिवसांपासून येणाऱया-जाणाऱयाचे लक्ष वेधून घेत आहेत. पुनर्बांधणी केलेल्या शाळांमध्ये शिवाजी नगर परिसरातील एका शाळेसह ‘पी-उत्तर’ विभागातील दोन शाळ तर ‘एफ-दक्षिण’ विभागातील एका शाळेचा समावेश आहे. तसेच दुरुस्तीकामासह आकर्षक रंगरंगोटी केलेल्या 62 शाळांमध्ये सर्वाधिक म्हणजे सात शाळा या ‘एम-पश्चिम’ विभागातील आहेत. त्याखालोखाल ‘एम- पूर्व’ विभागातील सहा शाळांचाही यात समावेश आहेत.

या शाळांची पुनर्बांधणी आणि खर्च
– ‘एफ-दक्षिण’ विभागातील परळ भोईवाडा मनपा शाळा (10 कोटी 55 लाख रुपये).
-‘पी-उत्तर’ विभागातील एम. एच. बी. गेट नंबर 7 जवळची पालिका शाळा (26 कोटी 46 लाख रुपये).
– ‘एम. एच. बी. गेट नंबर 8 मनपा शाळे’च्या पुनर्बांधकामासाठी रुपये 12 कोटी 32 लाख.
– ‘एम-पूर्व’ विभागातील शिवाजी नगर क्रमांक 3 (चिखलवाडी) मनपा शाळा (23 कोटी 11 लाख).
– या चारही शाळांच्या पुनर्बांधकामासाठी महापालिकेला रुपये 72 कोटी 44 लाख एवढा खर्च आला आहे.