दहिसरमध्ये तिवरे नष्ट करणाऱ्या बिल्डरविरोधात पालिका न्यायालयात अपील करणार

61

सामना प्रतिनिधी, मुंबई

दहिसर पूर्व आनंदनगर येथे भरणी टाकून तिवरे नष्ट करणाऱया विकासकाविरोधात पालिका न्यायालयात अपील करणार आहे. यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यासाठी विधी अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले असून कार्यवाही सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. याबाबत विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी विधी समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करून स्पष्टीकरण मागितले होते.

दहिसर पूर्वच्या सरस्वती कॉम्प्लेक्सजवळ असलेल्या मोकळय़ा भूखंडावर विकासकाने तिवरांची कत्तल करून या ठिकाणी बेकायदा पार्किंग सुरू केल्याची तक्रार शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने संबंधित डेव्हलपर्सविरोधात पालिकेने एमआरटीपी ऍक्टखाली दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने दहिसर पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ही दाखल करण्यात आला होता. याबाबत संबंधित बिल्डरला पालिकेने नोटीस पाठवल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेत भरणी करण्यास महसूल विभागाकडून परवानगी घेतल्याचे सांगितले. शिवाय वाहतूक विभागाचे परिपत्रकही न्यायालयात सादर केले. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने संबंधित बिल्डरच्या बाजूने निर्णय दिला आहे.

कांदळवनांचे संरक्षण करण्यासंदर्भात राज्य सरकारने वेळोवेळी शासन निर्णय जारी केले असून ही जागा खासगी असली तरी कांदळवनाची ऱ्हास झाल्याची तक्रार असल्यामुळे पर्यावरण संरक्षण अधिनियमअंतर्गत महसूल विभागाने कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिका याप्रकरणी न्यायालयात अपील करणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबत कार्यवाही करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून महसूल विभागाकडे पाठपुरावा केला असल्याचेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या