पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवरील उंदरांच्या खात्म्यासाठी पालिकेचा ‘स्पेशल प्रोग्राम’!

सामना ऑनलाईन । मुंबई

पाणी तुंबणाऱ्या ठिकाणच्या बिळांमधील उंदरांमुळे पसरणाऱ्या रोगराईला आळा घालण्यासाठी पालिकेने ‘स्पेशल प्रोग्राम’ आखला आहे. यामध्ये उंदारांची बिळे शोधून त्यांचा खात्मा केला जाणार आहे. मार्च, एप्रिल आणि मेमध्ये हा उपक्रम वेगाने राबवला जाणार असून पावसाळ्यापूर्वी ९५ टक्क्यांपर्यंत उंदरांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी असणाऱया बिळांमध्ये मोठय़ा प्रमाणात उंदरांचे वास्तव्य असते. या ठिकाणी पाणी तुंबल्यानंतर ‘लेटोस्पायरोसिस’सारखे साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर विशेष मोहिमेत आता उंदरांची बिळे बंद केली जातील. हे बीळ जर पुन्हा उघडले गेलेले दिसल्यास त्या ठिकाणी उंदीर असल्याची खात्री होईल. या ठिकाणी पॉयझन अथवा इतर उपायांनी उंदरांना मारण्यात येईल अशी माहिती पालिकेचे कीटकनाशक अधिकारी डॉ. राजन नारिंग्रेकर यांनी दिली. यामुळे उंदरांचे मलमूत्र पाण्यात मिसळून होणाऱ्या रोगांना आळा बसेल, असेही त्यांनी सांगितले.

सध्या मारलेल्या एका उंदरामागे १८ रुपये दिले जातात.
मारलेल्या उंदरांची गणना वॉर्ड आणि सेनापती बापट मार्ग येथील लॅबमध्ये केली जाते.
या लॅबमध्ये उंदरांची प्लेग टेस्टही करण्यात येते.
विभागानुसार एका दिवसात १०० ते १५० उंदीर मारण्याचे उद्दिष्ट आहे.
सध्या काही विभागांत १०० ते १५० चे उद्दिष्ट.
पूर्व उपनगरात ‘एम’ वेस्ट, ‘एस’, ‘एन’, शहरात ‘एफ’ नॉर्थ आणि ‘डी’ पायलट प्रोजेक्ट सुरू आहे

‘एनजीओ’ची मदत घेणार
पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सध्या उंदीर मारले जात आहेत. मात्र शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात वाढलेल्या उंदरांच्या संख्येमुळे या ठिकाणीही नियंत्रण आणण्याची गरज आहे. यासाठी ‘एनजीओ’ची मदत घेतली जाणार आहे. मात्र उंदीर मारण्याच्या कामासाठी एनजीओंचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुन्हा निविदा मागवून हे काम प्रभावीपणे केले जाणार आहे.