क्लीनअप मार्शलला मराठी आलेच पाहिजे!

106

सामना प्रतिनिधी । मुंबई

क्लीनअप मार्शलविरोधातील तक्रारी वाढल्यामुळे पालिकेने अखेर 24 नवीन संस्थांच्या नेमणुका करण्याचे ठरवले आहे. क्लीनअप मार्शलची मुजोरी वाढू नये म्हणून कंत्राटात अनेक अटी घालण्यात आल्या असून क्लीनअप मार्शलला मराठी लिहिता, वाचता व बोलता आलेच पाहिजे अशी अट घालण्यात आली आहे. तसेच पोलीस खात्याकडून त्यांची चारित्र्य पडताळणी करून घेणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून पालिकेने सन 2007 पासून क्लीनअप मार्शलची नेमणूक केली, मात्र गेल्या काही वर्षांत या मार्शलविषयीच्या तक्रारी वाढल्या होत्या. लोकांकडून जबरदस्तीने पैसे उकळणे, लोकांना त्रास देणे, धमकावणे, बनावट पावती देणे असे प्रकार वाढले होते. पोलीस ठाण्यांतही त्यांच्या विरोधातील तक्रारी वाढल्या होत्या. सन 2016 मध्ये 22 संस्थांना 24 वॉर्डांत कंत्राट देण्यात आले होते. या संस्थांना आतापर्यंत तीनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तिसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ मार्च महिन्यात संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संस्थांकडून प्रस्ताव मागवले असून त्यातून 24 संस्थांची निवड करण्यात आली आहे. या संस्थांशी करार करण्याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहे.

या आहेत अटी

  • प्रत्येत विभागात कमीतकमी 30 मार्शल चोवीस तास सेवा देणारे हवेत.
  • 1 ते 2.5 लाखांपर्यंतच्या अनामत रकमेच्या बदल्यात 2 ते 5 लाखांपर्यंतच्या किमतीची पावती पुस्तके दिली जातील.
  • पावती पुस्तक हरवल्यास संस्थेला आठ दिवसांच्या आत दिलेल्या टार्गेटपैकी 50 टक्के रक्कम भरावी लागेल.
  • गणवेश न घातल्यास प्रतिमार्शलला प्रतिदिन 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

…तर संस्था बाद होईल!
एखाद्या संस्थेच्या दंडाच्या रकमेबाबत किंवा दंड आकारण्याबाबत वाद असल्यास त्रिस्तरीय तक्रार निवारण पद्धती अमलात येणार आहे. तसेच मार्शलबाबतच्या तक्रारी सिद्ध झाल्यास त्यांच्यावर दंड आकारण्यात येणार आहे. चौथ्यावेळी तक्रार सिद्ध झाल्यास संस्थेला सात वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या