रहदारीला अडथळा ठरणारी ३ हजार ४१८ वाहने जप्त

सामना ऑनलाईन,मुंबई

मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर सोडून दिलेली ३ हजार ४१८ वाहने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्याद्वारे जप्त करण्यात आली. या वाहनांचा लिलाव आणि दंडातून महापालिकेला १ कोटी ४२ लाखांचा महसूल मिळाला. ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव करण्यात आला.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने १ जानेवारी २०१६ ते ३० जून २०१७ यादरम्यान ३ हजार ४१८ वाहने जप्त करण्यात आली होती. यापैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच २ हजार ७४७ वाहने सोडवून घेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे या वाहनांचा नुकताच लिलाव करण्यात आला. उपायुक्त रणजित ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या लिलावातून महापालिकेला ९५ लाख ९६ हजारांचा महसूल प्राप्त झाला. तर याच कालावधीदरम्यान संबंधितांद्वारे सोडविण्यात आलेल्या ६१२ वाहनांच्या दंडापोटी महापालिकेला ४६ लाख २६ हजार ३९० रुपये मिळाले, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन खात्याचे सहाय्यक आयुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली.

म्हणूनच केली कारवाई…

महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागी किंवा रस्त्यावर सोडून दिलेल्या वाहनांमुळे सार्वजनिक परिसरात अतिक्रमण होण्यासोबतच रस्त्यावरील वाहतुकीलाही अडथळा होत असतो. तसेच या वाहनांच्या टपावर किंवा वाहनांमध्ये पाणी साचून त्यात डेंग्यू-मलेरियाचा प्रसार करणाऱया डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी वाहने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलने खात्याद्वारे मुंबई महापालिका अधिनियम कलम ३१४ नुसार जप्त करण्यात येतात.

१ जानेवारी २०१६ ते ३० जून २०१७ या दीड वर्षाच्या कालावधीदरम्यान ३ हजार ४१८ वाहने जप्त करण्यात आली होती. यामध्ये २ हजार २१७ दुचाकी, ३०० तीनचाकी आणि ९०१ चारचाकी वाहनांचा समावेश होता. यापैकी ६१२ वाहने दंड भरून संबंधितांद्वारे सोडवून नेण्यात आली. या दंडापोटी संबंधितांनी ४६ लाख २६ हजार ३९० रुपये एवढी रक्कम महापालिकेकडे जमा केली. या ६१२ वाहनांमध्ये १९३ दुचाकी, ५० तीनचाकी, तर ३६९ चारचाकी वाहनांचा समावेश होता

अशी झाली कारवाई

  • महापालिकेने जप्त केलेल्या वाहनांपैकी जी वाहने सोडवून घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही अशा वाहनांच्या बाबतीत महापालिका अधिनियम कलम ४९० (३) प्रमाणे वजनानुसार लिलाव केला जातो.
  • यानुसार २ हजार ७४७ वाहनांचा नुकताच लिलाव करण्यात आला. तर उर्वरित ५९ वाहने ही विविध पोलीस खटल्यांशी संबंधित असल्याने लिलावातून वगळण्यात आली.
  • लिलाव करण्यात आलेल्या २ हजार ७४७ वाहनांचे वजन हे साधारणपणे ५ लाख ९५ हजार १२० किलो एवढे होते.
  • यामध्ये सुमारे १ लाख ९४ हजार ६०० किलो एवढय़ा वजनाच्या १ हजार ९७६ दुचाकी, ६५ हजार ५७० किलो एवढय़ा वजनाच्या २४३ तीनचाकी आणि ३ लाख ३४ हजार ९५० किलो एवढय़ा वजनाच्या ५२८ चारचाकी वाहनांचा समावेश होता.