पोखरलेली झाडे ठरताहेत जीवघेणी, धोका ओळखण्यासाठी पालिकेकडे यंत्रणाच नाही

सामना प्रतिनिधी, मुंबई

झाडे पडून होणाऱ्या दुर्घटना वाढल्या असताना आतून पोखरलेली झाडे ओळखण्यासाठी पालिकेकडे यंत्रणाच नसल्याचे समोर आले आहे. झाड कोसळल्यानंतरच आतून पोखरल्यामुळे दुर्घटना घडल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे धोकादायक झाडांच्या तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा निर्माण करण्याचे पालिकेसमोर आव्हान उभे राहिले आहे.

या वर्षीच्या पावसाळय़ात मुंबईत फांद्या कोसळून तर काही ठिकाणी पूर्ण झाड पडल्याने घडलेल्या दुर्घटनांमध्ये सात जणांना जीव गमवावा लागला आहे. पालिकेकडून धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी कंत्राटदाराकडून करण्यात येते. यामध्ये आतापर्यंत तब्बल 95 हजार झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्यात आल्या आहेत. या वर्षी झाडे पडणे, फांद्या पडण्याच्या घटना तब्बल 1400 घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये 21 जण जखमी झाले असून सात जणांना जीवही गमवावा लागला आहे.

रस्त्याशेजारील झाडांचा धोका जास्त
दादरमध्ये आतून पोखरलेले झाड अंगावर पडल्याने श्रेया राऊत ही मुलगी गंभीर जखमी झाली. तर मेट्रो सिनेमाजवळ झालेली दुर्घटनाही अशाच प्रकारे घडली होती. घडलेल्या दुर्घटनांमध्ये रस्त्याशेजारील झाडे जास्त धोकादायक ठरत आहेत. विशेष म्हणजे ही झाडे कीड-वाळवी लागून आतून पोखरलेली असल्याचे दुर्घटनेनंतर समोर येत आहे.

प्रशासन म्हणते…
मुंबईत सुमारे 29 लाख 75 हजार झाडे आहेत. यामध्ये रस्त्यालगत 1 लाख 85 हजार झाडे आहेत. या सर्व झाडांची तपासणी आणि धोकादायक फाद्यांची छाटणी पालिकेकडून केली जाते. मात्र वरून सुस्थितीत दिसणारी झाडे आतून पोखरल्याचे समजण्यासाठी कुठलेच तंत्रज्ञान आपल्याकडे नसल्याचे पालिका प्रशासन सांगते.