पूल, उड्डाणपूल, स्कायवॉकची दुरुस्ती! महापालिका खर्च करणार 42 कोटी

2

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालिकेने येत्या आर्थिक वर्षात मुंबईतील धोकादायक पूल पाडून त्यांची पुनर्बांधणी करणे, पुलांची दुरुस्ती, नवीन पूल बांधणे अशी कामे हाती घेतली आहेत. त्याअंतर्गत पालिकेने मोठ्या प्रमाणावर पुलांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. उड्डाणपूल, पादचारी पूल, स्कायवॉक, भुयारी मार्ग अशा तब्बल 53 ठिकाणांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यात वरळी, दादर, माटुंगा, माहीम येथील महत्त्वाच्या उड्डाणपुलांचीही समावेश आहे. पालिका याकरिता एकूण 42 कोटी खर्च करणार आहे.

महाडच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सगळ्याच जुन्या उड्डाणपुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला तर प्रभादेवी येथील चेंगराचेंगरीनंतर आणि अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वेवरील पादचारी पुलांच्याही दुरुस्तीची गरज निर्माण झाली. दहिसरमध्ये स्कायवॉकचा भाग कोसळल्यानंतर स्कायवॉकच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने चारशेहून अधिक वाहतूक पूल, पादचारी पूल तसेच भुयारी मार्गांचे ऑडिट केले.

लोकसंख्या वाढल्यामुळे या पुलांचा अनेक पटीनी जास्त वापर होत आहे. त्यामुळे या पुलांच्या क्षमतेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे पालिकेने या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणावर पुलांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. या अर्थसंकल्पात पूल या विभागाच्या भांडवली खर्चासाठी तब्बल 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात ही तरतूद केवळ 393 कोटी होती. पालिकेने येत्या आर्थिक वर्षात मुंबईतील धोकादायक पूल पाडून त्यांची पुनर्बांधणी करणे, पुलांची दुरुस्ती, नवीन पूल बांधणे अशी कामे हाती घेतली आहेत.

या महत्त्वाच्या पुलांची दुरुस्ती होणार

  • केशवसुत उड्डाणपूल, दादर पश्चिम.
  • टी. एच. कटारिया मार्ग, माटुंगा स्टेशन रोड येथील रेल्वेवरील उड्डाणपूल आणि समांतर पादचारी पूल.
  • माहीम रेल्वेवरील पादचारी पूल, पादचारी भुयारी मार्ग, उड्डाणपूल.
  • सेनापती बापट मार्गाला समांतर पादचारी पूल, माटुंगा स्टेशन. तसेच चेंबूर, गोवंडी, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे येथील पुलांचा या 53 पुलांमध्ये समावेश आहे.

शिवसेनेच्या मागणीमुळे स्कायवॉकची दुरुस्ती

मुंबईत सुमारे 36 स्कायवॉक असून ते 2010 ते 2013 या काळात एमएमआरडीएने बांधले असून त्यांची देखभाल करण्यासाठी ते पालिकेला हस्तांतरित करण्यात आले आहेत. या स्कायवॉकचेही ऑडिट करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केली होती. या ऑडिटमध्ये धोकादायक आढळलेल्या स्कायवॉकचीही दुरुस्ती आता पूल विभागाने हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात चेंबूर, वांद्रे, अंधेरी, विलेपार्ले येथील स्कायवॉकची दुरुस्ती केली जाणार आहे.

  • पालिका देखभाल करीत असलेले एकूण पूल – 344
  • पूल पाडणार – 14 (खर्च 13.8 कोटी)
  • मोठी दुरुस्ती आवश्यक असलेले पूल -47 (खर्च 61 कोटी)
  • छोट्या दुरुस्तीची आवश्यकता असलेले पूल – 176 (खर्च 202 कोटी)
  • अर्थसंकल्पात तरतूद – 180 कोटी.