नववर्षात पर्यटकांना झटका- गेटवे-एलिफंटा सागरी प्रवास महागला

सामना ऑनलाईन । अलिबाग

गेटवे ते एलिफंटा तसेच अलिबाग, मांडवा येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना नववर्षाच्या सुरुवातीलाच सागरी तिकीट दरवाढीचा झटका लागला आहे. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान लक्झरीच्या सागरी प्रवासी तिकिटात २० रुपयांची, तर गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा-अलिबाग तिकीट दरातही १० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पर्यटकांना कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करू न देता करण्यात आलेल्या भरमसाट तिकीट दरवाढीमुळे एलिफंटा सागरी प्रवास महागला असा पर्यटक आणि प्रवासीवर्गात नाराजीचा सूर आहे. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा-अलिबाग या सागरी मार्गावर गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेच्या लॉचेस मागील अनेक वर्षांपासून पर्यटक आणि प्रवाशांची वाहतूक करत आहेत. गेटवे-एलिफंटा या सागरी मार्गावर दरवर्षी सुमारे १२ लाख देशी-विदेशी पर्यटक प्रवास करतात.

जवळपास तासाभरातील सागरी प्रवासासाठी गेटवे-एलिफंटा दरम्यान पर्यटकांकडून तिकिटासाठी याआधी परतीच्या प्रवासासह १८० रुपये मोजावे लागत होते. मात्र नव्या वर्षापासून संस्थेने तिकीट दरात २० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे गेटवे-एलिफंटा या सागरी प्रवासासाठी पर्यटकांना २ जानेवारीपासून २०० रुपये मोजावे लागत आहेत. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा-अलिबाग या सागरी तिकीट दरातही १० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याआधी या मार्गावरील सागरी प्रवासासाठी ९५ रुपये तिकीट दर आकारला जात होता. त्यासाठी आता पर्यटक प्रवाशांना १०५ रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये मांडवा-अलिबाग बस सेवेचाही समावेश असल्याची माहिती संस्थेचे सदस्य सौरभ करमरकर यांनी दिली.

देशी-विदेशी पर्यटकांना समुद्र सफरीचा आनंद घेण्यासाठी संस्थेमार्फत अर्ध्या तासाची समुद्र हार्बर सफरही घडवली जाते. यासाठी आधी ८० रुपये तिकीट दर आकारण्यात येत होता. यामध्येही २ जानेवारीपासून १० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता हार्बरच्या अर्ध्या तासाच्या समुद्र सफरीसाठी ९० रुपये मोजावे लागणार आहेत. ऑर्डनरी लाँचेसच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसून १४५ रुपयांचा तिकीट दर कायम ठेवण्यात आला आहे. तिकीट दरवाढीसाठी शासनाने परवानगी दिलेली आहे. तसेच तिकीट दरवाढ ही इतर कर वगळून १० रुपयांनीच करण्यात आल्याचा दावा गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेचे सेक्रेटरी किफायत मुल्ला आणि सदस्य सौरभ करमरकर यांनी केला आहे.