रेवस-करंजा तरीत दुप्पट प्रवासी भरून वाहतूक, प्रवाशांमध्ये गोंधळ

50

सामना प्रतिनिधी, न्हावाशेवा

रेवस-करंजा जलमार्गावरील तरी मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जात असल्याने या धोकादायक प्रवासाला आळा घालावा अशी मागणी होत असतानाच रविवार ता.26 रोजी रेवसवरून सुटणाऱ्या तरीमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी भरल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून जादा प्रवाशांना तरीमधून उतरविल्याने मोठा अनर्थ टळला. मेरीटाईम मंडळाच्या या बोटीवर दंडात्मक कारवाई केली आहे.

रेवस वरून संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास करंजा येथे येणारी तरी आहे. मात्र रेवसवरून सुटणाऱ्या मुंबईकडे जाणाऱ्या लाँचेस बंद झाल्यामुळे या लाँचमधले प्रवासी या या तरीमध्ये आले. त्यामुळे या तरीमध्ये प्रवाशांची संख्या क्षमतेपेक्षा दुप्पट झाली. 150 प्रवाशांची क्षमता असलेल्या तरीमध्ये 350 प्रवासी बसले. आणि हे सगळे प्रवासी घेऊन ही बोट करंजाकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र प्रवाशांच्या दुप्पट संख्येमुळे ही बोट डळमळायला लागल्याने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली आणि गोंधळ निर्माण झाला. अखेर मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावून अर्ध्या प्रवाशांना खाली उतरविले आणि ही बोट करंजाकडे रवाना करण्यात आली. जर दुप्पट प्रवासी कोंबलेल्या अवस्थेत ही बोट समुद्रात गेली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

अलिबाग आणि उरण या दोन तालुक्याना जोडणाऱ्या रेवस-करंजा तरीला नेहमी प्रवाशांची गर्दी असते. उरण-अलिबाग येथे नोकरी, व्यवसाय करणारे आणि शिक्षण घेणारे, भाजीपाला विक्रेत्या या मार्गावरूनच प्रवास करतात. अगोदरच प्रवाशांची गर्दी होत असलेल्या या तरीमध्ये दुचाकी वाहने देखिल वाहून नेली जातात. त्यामुळे हा प्रवास धोकादायक होतो.

राहूल धायगुडे (करंजा बंदर निरिक्षक, मेरी टाईम बोर्ड)- रविवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मानस नावाची बोट करंजा बंदराकडे येण्यास निघाली होती. मात्र मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अजंता/ऑपोलो लाँचेस 26 मे पासून बंद झाल्यामुळे या बोटीमध्ये प्रवाशांची संख्या अचानक वाढली. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रवाशांना उतरविले. या प्रकरणी बोट मालकाला सक्त ताकिद देण्यात आली असून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या