शरीरातील उष्णतेमुळे होऊ शकतो तुमचा पासवर्ड लीक!


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन नवनवीन तंत्रज्ञानाच्या मार्गात अडथळे निर्माण करणारी गोष्ट म्हणजे हॅकिंग. कितीही सुरक्षित पासवर्ड ठेवला तरीही अनेकांचे पासवर्ड हॅक होतात. हॅकर्स पासवर्ड शोधून काढण्याची नवनवीन तंत्र शोधत असतात. पण, शरीराच्या उष्णतेमुळे तुमचा पासवर्ड लीक करण्याची नवीन किमया हॅकर्सना साधल्याचं वृत्त आहे.

ही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील काही संशोधकांनी ही गोष्ट शोधून काढली आहे. या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हा एक नवीन प्रकारचा हल्ला आहे. या हल्ल्यामध्ये मिड रेंजच्या थर्मल कॅमेऱ्याने कीबोर्डवर क्लिक केलेली बटणं सहज ओळखता येतात. जर तुम्ही कॉम्प्युटरवर पासवर्ड टाइप केलात आणि तिथून उठून दूर गेलात, तर नेमक्या कोणत्या कीज तुम्ही क्लिक केल्या आहेत, हे सहज कळू शकतं. थर्मल कॅमेरा कीबोर्डवरच्या कोणत्या कीजवर तुमच्या शरीराची उष्णता दिसतेय ते शोधतो. या प्रकाराला थर्मंटॉर असं म्हटलं जातं. या प्रक्रियेत थर्मल कॅमेऱ्याला कीबोर्ड स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने सेट केलं जातं. त्यानंतर कोणती बटणं किंवा कीज दाबल्या गेल्या आहेत याचं फुटेज घेऊन त्याद्वारे पासवर्ड हॅक केला जाऊ शकतो.

अशा प्रकारच्या हॅकिंगने शब्द, कोड किंवा बँकेचे पिन्स हस्तगत होऊ शकतात. या हॅकिंगच्या ट्रायल प्रक्रियेत चार वेगवेगळ्या की बोर्ड्सवर प्रयोग केला गेला. या कॅमेऱ्याच्या फुटेजवरून सामान्य व्यक्तीही एखादा पासवर्ड हॅक करू शकत असल्याचं निष्पन्न झालं आहे.