मराठमोळा शरीरसौष्ठवपटू प्रताप घोलपला हवाय मदतीचा हात

सामना क्री.प. । मुंबई

ज्युनियर मुंबई श्री, नवोदित मुंबई श्री, मुंबई श्री, हीरक महोत्सव श्री, आर एम भट्ट श्री यांसारख्या मानाच्या स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या २६ वर्षीय प्रताप घोलप या मराठमोळ्या तरुणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करायचे आहे. मात्र शिवडी येथे वास्तव्याला असलेला प्रताप घोलप सध्या बिकट परिस्थितीतून जात आहे. आई व लहान भाऊ असे छोटेखानी कुटुंबासोबत राहात असलेल्या प्रताप घोलप याला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.

img-20170712-wa0035-2

प्रताप घोलप लहान असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्याला शिक्षणही पूर्ण करता आले नाही. उदरनिर्वाहाची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर येऊन पडली. वयाच्या १६ व्या वर्षी जिमकडे पावले वळवणाऱया या युवकाने त्यामध्येच करीअर करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्याने प्रयत्नांची शिकस्तही केली. आर एम भट्ट व्यायामशाळेत शरीराला आकार देणारा हा तरुण आता प्रायव्हेट टिचींगने आपले घर चालवतोय. मात्र शरीरसौष्ठव हा खेळ प्रचंड खर्चिक असल्यामुळे त्याचं भागत नाही.

मनीष अडविलकर, राकेश भिल्लारेकडून मोलाची मदत
प्रताप घोलप याला मनीष अडविलकर व राकेश भिलारे या दोघांकडून मोलाची मदत होत आहे. मनीष अडविलकर यांच्याकडून त्याने बॉडीबिल्डिंगचे बाळकडू आत्मसात केले. तसेच राकेश भिलारे हा त्याचा जवळचा मित्र असून वेळोवेळी आर्थिक मदत त्याच्याकडून होत असते. पडत्या काळात या दोघांनीच प्रताप घोलपला मदत करीत आत्मविश्वास वाढवण्याचे काम चोखपणे पार पाडले.