भंडारा शहरातील बनावट विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

सामना ऑनलाईन । नागपूर

भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्डात सुरू असलेल्या बनावट विदेशी दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून बनावट दारूसाठा व चारचाकी वाहन असा 3 लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्तीवर असताना कारधा येथे एका संशयास्पद व्हॅनची झडती घेतली असता, त्याठिकाणी बनावट विदेशी दारुच्या 350 बाटल्या आढळून आल्या. या दारुसाठ्य़ाबाबत आरोपींना विचारणा केली असता त्यांनी आंबेडकर वॉर्डातील एका घरातून आणल्याचे सांगितले. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तात्काळ आंबेडकर वॉर्डातील त्या घरावर छापा टाकला. त्यावेळी प्रशांत दुर्गाप्रसाद मानवटकर (28) रा. शुक्रवारी, भंडारा, चेतन सुरेश चकोले (28) रा. शुक्रवारी, भंडारा, गोपाल धनबहादूर ठाकूर रा. आंबेडकर वॉर्ड, गोलू उर्फ सरीन विनोद गोस्वामी (24) रा. शहीद वॉर्ड, भंडारा, कैलास गोपीचंद मोहरकर (30) रा.आंबेडकर वॉर्ड भंडारा हे पाच जण बनावट विदेशी दारू तयार करताना आढळून आले.

आरोपींच्या ताब्यातून ओमनी व्हॅन, एक दुचाकी, दारूच्या 985 बनावट बाटल्या, मध्यप्रदेशातील सिल्वर जेट व्हिस्कीच्या 4 बाटल्या, 2 हजार झाकणे, कॉक, बुच आणि 550 बनावट लेबल, स्पिरीटच्या वासाचे केमिकल आणि दारु तयार करण्याचे अन्य साहित्य असा 3 लाख 29 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाचही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपी फरार आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त अश्‍विनी जोशी, संचालक सुनील चौहाण, उपआयुक्त उषा वर्मा, भंडाराचे अधीक्षक शशीकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तानाजी आदींनी केली.