तोतया पोलिसांनी ऑर्केस्ट्रा मालकाला १० लाखांना लुटले

फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी, डोंबिवली

सत्य साईबाबा यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याकडील पैसा अनेकांनी हडप केला आहे. आता तो मार्केटमध्ये आणून पांढरा करायचा आहे. संबंधित व्यक्तीकडे सर्व १०० च्या नोटा आहेत. त्या दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी तो १० टक्के कमिशन देणार आहे, अशी बतावणी करून सहा भामट्यांनी एका ऑर्केस्ट्रा मालकाला १० लाख रुपयांना लुटल्याची घटना मानपाडा परिसरात घडली आहे.

पुणे येथील कराची स्ट्रीटवर राहणाऱ्या नरेंद्र नवीनचंद्र ठक्कर या भामट्याने ठाणे येथील सावरकरनगरमध्ये राहणारे राजेश ओहळ यांना १० लाख रुपयांची रक्कम घेऊन डोंबिवली येथील कल्याण-शिळफाटा मार्गावर बोलविले. या ठिकाणी त्यांना एक इसम सत्य साईबाबांच्या मठातून हडप केलेल्या १० लाख रुपयांच्या १०० रुपये किमतीच्या नोटा देणार होता. ओहळ आणि त्यांचे मित्र संतोष मुदलीयार हे तिथे गेले असता नरेंद्र याने त्यांच्याकडील रकमेचे बॅग घेऊन कुणाल आणि बाबू नावाच्या इसमांकडे दिली. त्याचवेळी अन्य तीन भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून तिथे रेड टाकली आणि ते पैसे घेऊन पसार झाले. आम्ही आता पोलीस ठाण्यात जाऊन पैसे घेऊन येतो, तुम्ही पैसे आणि कमिशन घेऊन मॉलजवळ येतो असे सांगून नरेंद्र निधून गेला. आणि परत आलाच नाही.