बोगस भरती प्रकरण : माजी नगराध्यक्ष, तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासह १५ जणांविरुध्द गुन्हा

6
प्रातिनिधिक फोटो

श्रीकांत देव । भोकर

पदाचा गैरवापर करत शासनाची दिशाभूल करून नियमबाह्य कर्मचाऱ्यांची भरती केल्याप्रकरणी प्रभाग क्र.१३ च्या नगरसेविका अरुणा विनायक देशमुख यांनी केलेल्या तक्रारीवरुन कोर्टाच्या आदेशानुसार सोमवारी माजी नगराध्यक्ष, तत्कालीन दोन मुख्याधिकारी, कर्मचारी व उमेदवार यांच्यासह एकूण पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भोकर विधानसभा क्षेत्रातील जवळपास सर्वच सामाजिक संस्थावर काँग्रेस पक्षाने वर्चस्व मिळवत मक्तेदारी सिद्ध केली. परंतु यावर अंकुश ठेवण्यात अशोक चव्हाण सपशेल फेल ठरल्याचे मागील काही दिवसापासून भ्रष्टाचाराचे एकापाठोपाठ प्रकरण चव्हाट्यावर येण्यास सुरू झाल्यापासून सिद्ध होत आहे. बाजार समितीतील बांधकाम न करता उचललेले साडेसात लाख, घनकचरा प्रकरणी संगनमत करून उचललेले अठरा लाख या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यावर नुकताच भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल असताना आता लगेच नगर परिषदेत कर्मचाऱ्यांची बोगस भरती प्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार पुन्हा गुन्हा दाखल झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

१५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान आशुतोष दिगंबर चिंचाळकर, मुख्यधिकारी न.प.परतूर जि.जालना, तत्कालीन मुख्यधिकारी राहूल वाघ,माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, गजानन सावरगावकर तत्कालीन नगर अभियंता, श्रीहरी चौडेकर तत्का.पाणीपुरवठा अभियंता, रामसिंग लोध तत्का.लेखापाल, शारिरीक शिक्षक, त्रिरन्त सुरेश कावळे फायरमन, रमाकांत पंढरीनाथ कांबळे, संदिप मारोती श्रीरामवार, नागेश व्यंकट चाटलावार, शिपाई दिलीप नारायण देवतळे, संजय बन्सी पवार, महेश दरबस्तवार, नारायण रामा इरेवाड आदी आरोपी संगनमत करून पुर्वनियोजित कट रचून, शासकीय कागदपत्र बनावट बनवून, शासकीय नियमांना डावलून जनतेची व शासनाची फसवणूक करून बोगस कर्मचारी भरती केल्याप्रकरणी नगरसेविका अरुणा देशमुख यांनी तक्रार करत या भरती प्रक्रियेत प्रत्येक उमेदवाराकडून लाखो रुपये उकळल्याचे सबळ पुरावे देवून कारवाईची मागणी वरिष्ठांकडे केली असता या गैरप्रकारांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष राजकीय दबावामुळे करण्यात आल्याने अरुणा देशमुख यांनी न्यायालयात दाद मागितली असता कागदपत्रांच्या ठोस पुराव्यावरून कोर्टाने या आरोपीविरुद्ध कलम १२०(ब), १६६ (अ),१६७,१६८,४०६,४०९,४२ ०,४१३,४२६, ४६५,४६७, ४६८, ४७१,४७४,४७७(अ) भादवीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानुसार भोकर पोलिसात गुन्हा नोदवण्यात येवून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत. भ्रष्टाचार प्रकरणी कॉंग्रेस पदाधिकारी व अधिकारी यांच्या विरूद्ध भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे दाखल होण्याची मालिकाच सुरु झाल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.