बकऱ्यांना वाचवताना बोलेरोने दोघांना उडवले, मृतामध्ये 4 वर्षीय चिमुरडीचा समावेश

सामना प्रतिनिधी । वडीगोद्री

गाडीच्या समोर आलेल्या बकऱ्यास वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या महिलेस भरधाव बोलेरो गाडीने जोरदार धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. तसेच समोरून येणाऱ्या महिंद्रा मॅक्झीमो गाडीवर बोलेरोची धडक बसली व बोलेरो पलटी होऊन यातील एक चार वर्षाची मुलगी गाडी खाली दबल्याने जागीच ठार झाली. ही घटना जालना जिल्ह्यातील अंबड-वडीगोद्री रोडवर धाकलगाव येथे घडली.

अंबडकडून बीडकडे देवदर्शनासाठी निघालेली बोलेरो (एम. एच. 21 व्ही. 8277) गाडीच्या समोर धाकलगाव जवळ अचानक एक बकरा रस्त्यात आडवा आला. त्या बकऱ्यास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेने शेतात मजुरीसाठी जाणाऱ्या वृद्ध महिलेस भरधाव बोलेरो गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये धाकलगाव येथील सुकराबी बशीर पठाण (60) या जागीच ठार झाल्या.तर बोलेरो विरुद्ध दिशेने येणाऱ्या महिंद्रा मॅक्झीमो (एम. एच. 14 डी. एफ. 9307) गाडीवर जाऊन धडकल्याने पलटी झाली व या मधील श्रुती शंकर धानुरे (4) रा. बोधलापुरी ता. घनसावंगी ही बोलेरो खाली दबल्याने जागीच मृत पावली. तर रामभाऊ पुंड, आत्माराम मोरे, शंकर धानुरे, शिल्पा शंकर धानुरे, विजय पुंड सर्व रा.बोधलापुरी ता. घनसावंगी, मॅक्झीमो गाडी चालक मुसा वाहेद रा. धाकलगाव असे सहाजण जखमी झाले. अपघात होताच बोलेरोचा चालक गाडी सोडून पळून गेला. बोलेरो चालकाने सुसाट वेगाने गाडी चालवल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.