बॉलिवुड चित्रपटांची संगीतमय जन्माष्टमी

सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूड आणि आपल्या उत्सवांचं नातं वेगळचं आहे. या नात्यातील महत्वाचा भाग म्हणजेच बॉलिवुडची गाणी. आज कृष्णजन्माष्टमी. संपूर्ण हिंदुस्थानात जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या जल्लोशात साजरा करण्यात येतो. ठिकठिकाणी दहिहंडी फोडून गोविंदा पथकं हा उत्सव साजरा करतात. असंच काहीसं चित्र आपल्याला बॉलिवुडच्या चित्रपटांमध्येही दिसून येतं. चित्रपटातील नायक दहिहंडी फोडण्यासाठी आपल्या टोळीसोबत जातो आणि या प्रसंगासाठी एक गाण्याचा सिक्वेन्स दाखवण्यात येतो. आज या जन्माष्टमीच्या दिवशी आम्ही आपल्यालासाठी जन्माष्टमी विशेष बॉलिवुडमधील काही खास गाणी घेऊन आलो आहोत.
१. गोविंदा आला रे, ब्लफ मास्टर (१९६३)

अभिनेता शम्मी कपूरचं आपल्या टोळीसोबत येणं आणि उत्सव साजरा करणं, प्रत्येक जन्माष्टमीचं हे गाणं एक महत्वाचा भाग आहे. या गाण्याला कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केलं असून  मोहम्मद रफी यांनी गायलं आहे.

 २. यशोमति मैया से बोले नंदलाला, सत्यम शिवम सुंदरम (१९७८)

बॉलिवुडचे शोमॅन राज कपूर यांच्या चित्रपटांची खासियत म्हणजे त्यातील गाणी. ‘सत्यम शिवम सुंदरम’ त्यातीलच एक चित्रपट. या गाण्यामध्ये बालवयातील पद्मिनी कोल्हापुरे यांनी अभिनय केला आहे. हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं असून लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलं आहे.
३. बडा नटखट है ये किसन कन्हैया, अमर प्रेम (१९७३) 

हे गाणं आई आणि मुलावर चित्रीत  केलं असून आर. डी बरमन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं आहे.
४. मच गया शोर सारी नगरी रे, खुद्दार(१९८९)

 चित्रपटातील हे गाणं अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी यांच्यावर चित्रीत केलं आहे. जन्माष्टमीसाठीचे सगळ्यात लोकप्रिय गाणं आहे.
५. चांदी की डाल पर, हॅलो ब्रदर (१९९९) 

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलेलं आहे. हे गाणं अभिनेता सलमान खान आणि गायिका अलका याज्ञिक यांनी गायलं असून हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केले आहे.
६. राधा कैसे न जले, लगान (२००१)

हे गाणं अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री ग्रेसी सिंह यांच्यावर चित्रीत करण्यात आलं असून या गाण्यात खट्याळ कृष्ण आणि राधा यांच्यातील प्रेमळ वाद दाखवला आहे. हे गाणं उदित नारायण, आशा भोसले आणि वैशाली सामंत यांनी गायलं असून ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलं आहे.
७. वो किसना है, किसना (२००५)

हे गाणं अभिनेता विवेक ओबेरॉय आणि अभिनेत्री ईशा शर्वाणी यांच्यावर चित्रीत झालेलं आहे. ए.आर. रहेमान आणि इस्माईल दरबार यांनी संगीतबद्ध केले असून सुखविंदर सिंग, आयशा दरबार यांनी गायलं आहे.