हिंदुस्थानातलं ‘करोडपती’ गाव; येथे सगळेच आहेत कोट्यधीश

सामना ऑनलाईन । इटानगर

हिंदुस्थानात अशी अनेक गरीब गावं तुम्हाला माहिती असतील ज्या गावातील लोकांना एक वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. मात्र हिंदुस्थानात असंही एक गाव आहेत, जेथे राहणारे सर्वजण करोडपती आहेत. तुम्हाला माहीत ते गाव आहे का? तुम्हालाही उत्सुकता लागली असेल कुठे आहे हे करोडपती लोकांचं गाव. तर हे गाव अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात असून बोमजा असं या गावाचं नाव आहे. आशियातील सर्वात श्रीमंत गावांमध्ये या गावाचा समावेश होतो.

सध्या या करोडपती गावाची सर्वत्र चर्चा आहे. खरंतर या गावातील जमीन लष्करानं संपादित केली आहे. संरक्षण मंत्रालयानं या नागरिकांना जमिनीच्या बदल्यात एक-एक कोटींहून अधिक रक्कम भरपाई म्हणून दिली आहे. एकूण २००.०५६ एकर जमिनीच्या बदल्यात संरक्षण मंत्रालयानं या गावातील एकूण ३१ कुटुंबाना ४०.८ कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये २९ कुटुंबाना १.०९ कोटी रुपये तर अन्य दोन कुटुंबाना २.४ आणि ६.७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या रकमेचा धनादेश या कुटुंबांना दिला आहे.