सुशीलकुमारांनी दिलेले ‘राष्ट्रपती’पद पवारांना नकोसे!

सामना ऑनलाईन । पुणे

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ‘भावी राष्ट्रपती’ म्हणून उल्लेख केला, पण पवारांनी मात्र राष्ट्रपती झाला की त्यानंतर व्यक्ती निवृत्ती होते. मी त्या रस्त्यानेच जायला इच्छुक नाही, असे सांगत हे राष्ट्रपतीपद नाकारले.

माजी राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक व राजकीय जीवनाच्या ५० वर्षे पूर्तीबद्दल ‘भारताची प्रतिभा’ या जीवनगौरव ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. प्रतिभाताई पाटील यांचा सत्कार व गौरवग्रंथाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार होते मात्र प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तो धागा पकडून सुशीलकुमार शिंदे यांनी माजी राष्ट्रपती आले नसले तरी भावी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव होत असल्याचे नमूद केले. शरद पवारांनी तत्काळ व्यासपीठावरून नकारार्थी हात हलविला. त्यावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, पवारांनी नाही असा इशारा करणे म्हणजे होकारार्थ असतो. पवार यांच्या करंगळीला धरून मी राजकारणात आलो आहे. ते माझ्यासाठी राजकीय तत्त्वज्ञ आहेत. त्यांनी राजकारणातील कात्रजचा घाट कसा पार करायचा हे शिकवले असे शिंदे यांनी सांगताच ‘मी काय गुन्हा केलाय का’ अशी टिप्पणी पवारांनी जोडली.

पवार यांनी त्यांच्या भाषणाचा शेवट करताना त्याबाबत स्पष्टीकरण दिले. राष्ट्रपती झाले की ती व्यक्ती निवृत्त होते. राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या बाबतीत हे घडते. त्याला अपवाद फक्त सुशीलकुमार शिंदे आहेत. राज्यपाल म्हणून काम केल्यानंतर ते देशाचे गृहमंत्री झाले. त्यांच्या इतकी उडी मला जमणार नाही. त्या रस्त्याने जायला मी इच्छुक नसल्याचे पवार यांनी सांगितले.

प्रतिभाताईंचे मुख्यमंत्रीपद हिरावून घेतले – शदर पवार
प्रतिभाताईंच्या कार्याचा गौरव करताना शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री असताना प्रतिभाताई पाटील या विरोधी पक्षनेत्या होत्या. विधिमंडळातील कर्तृत्ववान विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. पाटील यांनाही मुख्यमंत्रीपद मिळाले असते, मात्र यांचे मुख्यमंत्रीपद देखील मीच हिरावून घेतले. तेव्हा राजीव गांधींच्या सांगण्यावरून मी मुख्यमंत्रीपद स्वीकारले नसते तर तो अधिकार प्रतिभाताईंना मिळाला असता. त्यांना ती संधी मिळाली नाही, मात्र देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होता आले. त्यांनी ते समर्थपणे संभाळल्याचे पवार यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांना विसरू शकत नाही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मी विसरू शकत नाही. माझे नाव राष्ट्रपतीपदासाठी निश्चित झाले तेव्हा सगळ्यात आधी मला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. म्हणून त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे आणि माझे काका डुंगुरसिंग पाटील यांनी सत्यशोधक समाजात बरोबर काम केले. महाराष्ट्रातील आपली भगिनी राष्ट्रपती होते म्हणून त्यांनी राजकीय संबंधांची पर्वा न करता मला मनापासून पाठिंबा दिला म्हणून प्रतिभाताई यांनी शिवसेनाप्रमुखांचे आभार मानले.