इस्लामी आघातावर प्रत्याघात

>> मल्हार कृष्ण गोखले

इसवी सन ६४४ मध्ये हिंदुस्थानच्या सीमेवरच्या सिंध या प्रांतावर अरब इस्लामी आक्रमकांचे पहिले आक्रमण झाले. तेव्हापासून हिंदुस्थानातले हिंदू सतत मार खात आहेत. पराभव पचवून, हार खाऊन मागे हटत आहेत. हिंदुस्थानचा गेल्या पंधराशे वर्षांचा इतिहास म्हणजे हिंदू समाजाच्या सततच्या पराभवाची दारुण आणि करुण कथा, असा गैरसमज आहे. हा गैरसमज प्रथम इंग्रज आणि मग मार्क्सवादी इतिहासकारांनी मुद्दाम निर्माण करून अगदी दृढमूल केला आहे. म्हणून तर पहा, आपल्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकात ‘मुस्लिम कालखंड’ या प्रकरणानंतर एकदम ‘ब्रिटिश कालखंड’ असतो. ‘हिंदू कालखंड’ दिलाच जात नाही.

 

इ.स. ६३० मध्ये महम्मद पैगंबरांच्या मृत्यूनंतर इस्लाम अत्यंत वेगाने अरबस्तानच्या बाहेर पसरला. इस्लामच्या प्रलयकारी शक्तीसमोर इजिप्त, पर्शिया आणि रोमन बायझंटाईन साम्राज्ये वाळूच्या किल्ल्यांसारखी कोसळली. त्या प्रदेशांमधले मूळ धर्म, त्यांची संस्कृती, परंपरा सर्व काही इस्लामी झंझावातासमोर नष्ट झाले.

 

फक्त हिंदुस्थानातच असे झाले नाही. सुरुवातीच्या अरब इस्लामी आक्रमकांना तर सीमावर्ती प्रदेशातल्या हिंदू राजांनी पराभूतच केले. हा काळ ७ वे शतक ते ११ वे शतक एवढा प्रदीर्घ आहे. ११ व्या शतकापासून मात्र इस्लाम हिंदुस्थानात वेगाने घुसू लागला. हे आक्रमक तुर्क आणि अफगाण होते. तरीही संपूर्ण हिंदुस्थानात पसरायला इस्लामला पुढची सहा शतके लागली. हिंदू भले पराभूत झाले; पण इजिप्त, मध्य आशिया, उत्तर आफ्रिका, बाल्कन देश, पर्शिया यांच्याप्रमाणे हिंदूंचा धर्म-संस्कृती नष्ट कधीच झाली नाही. हिंदू सतत लढत राहिले. वारंवार पराभूत होऊनही पुनःपुन्हा लढत राहिले.

 

इंग्रज आणि मार्क्सवादी इतिहासकार ‘हिंदू कालखंड’ गाळून टाकतात त्याचे हेच तर कारण आहे. अत्यंत भीषण अशा कत्तली, अमानुष असे अत्याचार, बाटवाबाटवी, विध्वंस, गुलामगिरी यांना तोंड देत हिंदू समाज पुनःपुन्हा प्रतिकारासाठी उठून उभा राहिला, हे जर नव्या पिढीला समजले, तर त्यांच्या मनातही पराक्रमाची, कर्तबगारीची, आघातावर प्रत्याघात करण्याची प्रेरणा निर्माण होईल ना! इंग्रज आणि मार्क्सवाद्यांना तेच तर नको होते.

 

पण कोंबडे झाकले म्हणून सूर्य उजाडायचा थांबत नसतो. इसवी सन ६४४च्या पहिल्या इस्लामी आक्रमणापासून जयपाल, आनंदपाल, भीमपाल, त्रिलोचनपाल, चौहान राजपूत, गाहडवाल राजपूत, माळव्याचे परमार, त्रिपुरीचे कलचुरी, गुजरातचे चालुक्य, ओडिशाचे गजपती राजे, आसामचे अहोम राजे, विजयनगरचे हरिहर – बुक्क, महाराष्ट्राचे शिवछत्रपती, मराठय़ांचा तब्बल पंचवीस वर्षांचा प्रचंड स्वातंत्र्यसंग्राम आणि अखेर औरंगजेबाचा मृत्यू. असा ७व्या शतकापासून  १८व्या शतकापर्यंतचा ‘हिंदू कालखंडा’चा इतिहास प्रस्तुत ‘इस्लामी आघातावर हिंदूंचा प्रत्याघात’ या अस्सल ग्रंथाद्वारे लेखक डॉ. शरद हेबाळकर यांनी मांडला आहे.

 

मूळ पुस्तक हिंदीमध्ये आहे. त्याचा मराठी अनुवाद डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या समर्थ लेखणीतून उतरला आहे. प्रत्येक हिंदुत्वप्रेमीने आवर्जून वाचावे आणि पुनःपुन्हा वाचत राहावे, असे पुस्तक.

 

सतीश भावसार यांचे अर्थवाही मुखपृष्ठ आणि नवचैतन्य प्रकाशनाची निर्मिती सुबक आहे.

 

इस्लामी आघातावर हिंदूंचा प्रत्याघात

मूळ लेखक – डॉ. शरद हेबाळकर,

मराठी अनुवाद – डॉ. सच्चिदानंद शेवडे

प्रकाशक –  नवचैतन्य,

पृष्ठ – २४८

किंमत – २८० रुपये.