अस्सल कथांची गुंफण

>> नमिता वारणकर

किशोरवयीन मुलांच्या नजरेतून जगाकडे पाहणाऱया प्रथितयश लेखकांच्या कथांचा संग्रह ‘अचंब्याच्या गोष्टी’ या पुस्तकाच्या माध्यमातून वाचायला मिळतो. ज्या मुलांचं बालपण संपत आलं आहे, पण पौगंडावस्था अजून आलेली नाही अशा मुलांच्या विचारांचा वेध घेणाऱया कथा या पुस्तकात प्रसिद्ध झाल्या आहेत. लहान मुलं-मुली भातुकली, बाहुलीचं लग> अशा खेळांतून नकळत मोठय़ा माणसांचं अनुकरण, मोठय़ांची भाषा, त्यांच्यासारखे हावभाव कसे करतात याचा उलगडा या पुस्तकातील कथा वाचताना होतो.

कथा सांगितली जाते, लिहिली जाते. याप्रमाणेच ती कोणाच्या दृष्टिकोनातून (पॉइंट ऑफ ह्यूने) सांगितली गेलीय हे महत्त्वाचं. तसेच किशोरवयीन मुलांची मानसिकता, भावनांचा कल्लोळ, कथेतील भाषेचा, संवेदनांचा तोल, ती परिणामकारक होण्यासाठी कुठल्या पात्राच्या तोंडून सांगितली आहे, कुठलं पात्र केंद्रस्थानी ठेवलंय हेही महत्त्वाचं असतं, तर कधी पात्र वयाने लहान असतं, त्याचं आकलन कमी असतं. काही वेळा मोठय़ा माणसांचं वागणं या मुलांना उमजत नाही अशा पैलूंवर आधारलेल्या किशोरवयीन मुलांच्या कथांचं संपादन ‘अचंब्याच्या गोष्टी’च्या माध्यमातून सुबोध जावडेकर आणि मधुकर धर्मापुरीकर यांनी केलं आहे.

या पुस्तकातील कथांमधल्या घटना, प्रसंग, पात्र निरनिराळी आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून यातील प्रत्येक कथा सांगितल्या गेल्या आहेत. यातील पात्रांची समज कमी आहे. किशोरवयीन मानसिकता बाळगून कथा लिहिणं ही काय जादू असते या दृष्टीने या संग्रहातल्या कथा वाचायला मिळतात. जाणत्या-अजाणत्या वयाच्या उंबरठय़ावर उभं असताना मुलांना सगळंच खरं वाटत असतं. यामुळेच या वयात मुलांना वाटणाऱया कुतूहल आणि आकलनात कोणतेही पूर्वग्रह नसतात. त्यामुळे या वयातील अनुभवावर आधारलेल्या कथांमधला अस्सलपणा कथा वाचताना जाणवतो.

सई परांजपेंची ‘मोराचे पीस’नावाची कथा फारच सुंदर आहे. या कथेतला बच्चू शिशुवर्गात आहे. या गोड मुलाची  आणि त्याच्या बाईंची ही कथा आहे. या दोघांमधल्या कोवळ्या नात्यांमध्ये लेखिकेने हळुवार रंग भरले आहेत. ‘आजोबांचे लग>’ ही कथा लहान नातवाच्या तोंडी घालण्यात वामन इंगळेंच्या चतुराईला दाद द्यायला हवी. त्याचप्रमाणे आजी-आजोबांच्या लुटुपुटीच्या भांडणाचं वर्णन लेखक विद्याधर पुंडलिकांनी आजी शरण येते या कथेत केले आहे. आजी-आजोबा खरोखरच भांडताहेत का की त्यांच्या बोलण्याआड काहीतरी दडलंय याचा कथेतल्या लहान मुलाला अजिबात पत्ता नाही. कथेतील नातवाच्या निरागस वागण्यामुळे कथेला वेगळाच गोडवा प्राप्त झाला आहे.

अशाचप्रकारे यशवंत कर्णिक यांची डोलकाठी, आनंद जातेगावकरांची ‘भातुकली’, जी. ए. कुलकर्णींची ‘लग>’, मिलिंद बोकील यांची ‘पतंग’, रा. रं. बोराडेंची ‘खेळ’, सखा कलाल यांची ‘हिरवी काच’, वामन काळेंची ‘लेखकाची गोष्ट’, विलास मोहितेंची ‘धग’ या बालमनाचे अनेक पैलू उलगडणाऱया कथांचा आनंद ‘अचंब्याच्या गोष्टी’ या पुस्तकातून घेता येतो.  सर्वच कथांच्या मुळाशी असमंजस वय, असमंजसातून उद्भवणारे कुतूहल आणि कुतूहलातूनच समजदार माणसं, शहाणी माणसं, त्यांचं मोठं आयुष्य याचं अचंब्यातून होणारं आकलन, अचंब्यातलेच प्रश्न, अचंब्यातलीच निरीक्षणं… आणि अचंब्यातलेच निष्कर्ष…मोठय़ा माणसाच्या आकलनापेक्षा अचंब्यातून होणारे आकलन मोलाचे वाटले कारण. या आकलनाला कोणतेही पूर्वग्रह लगडलेले नसतात.

अचंब्याच्या गोष्टी

संपादन –  सुबोध जावडेकर, मधुकर धर्मापुरीकर

प्रकाशक – मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

पृष्ठ – १८०

किंमत – २५० रुपये