परीक्षण – आस्वादक काव्यगीता

>> अरविंद दोडे

गीता! मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं गीता माणसाला आत्मबळ देते. गीताज्ञान नियमितपणे आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यास जगण्यास प्रेरणा मिळते, सकारात्मक ऊर्जा वाढते, संकटांशी सामना करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. प्रत्येक क्षणाचं नित्यनूतनत्व मनोमन पटतं आणि प्रसन्नतेचा मळा फुलवतं. आपल्या आयुष्यातल्या विषादयोगाला गंगेचं पावित्र्य देणारी गीता कर्मकौशल्य शिकवते. ज्ञानयोग साधून संन्यस्त वृत्तीने आत्मसंयोगाची दीक्षा देते. विज्ञानाच्या विश्वाचा परिचय करून देताना राजगुह्य सांगते. असा हा ब्रह्माक्षरयोग ज्याच्या जीवनात येतो, त्याला विभूतियोगाची आत्मानुभूती येते. त्यातून विश्वरूपदर्शनानं मानवी जन्म धन्य धन्य होतो. अशा या गीतातत्त्वाचा अभ्यास करताना ‘काव्यगीता’ वंदना ताम्हाणे यांना सुचली आणि एका ध्यानावस्थेत त्यांनी लिहून काढली. हा अमृतानुभव वाचकालाही वाचताना येऊ शकतो.

प्रत्येक अध्यायास साजेशा अठरा कविता आणि त्याचा अर्थ असा हा ‘गुरु-शिष्य’ संवाद मधाळ अन् रसाळ झालाय. अर्थात या कविता समश्लोकी नाहीत. प्रत्येक अध्यायाचा सारांश संक्षिप्त रूपात कवितेत आलाय.

कर्मे घडावी सहजचि
अहं न बाळगावा फुकाचि ।
सर्व सत्ता मज हाती
कशास अभिमान उगाचि ।।

या तिसऱया अध्यायात कर्मयोगाची महती आहे. प्रत्येक अध्यायास वंदनाताईंनी वेगळं नाव दिलंय. गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती वगैरे. प्रत्येक शक्तिदेवता प्रत्येक अध्यायात रूपकाच्या रूपाने अवतरलीय. काव्य करताना, त्याचा अन्वयार्थ करताना अनेक संदर्भ ग्रंथांचा उपयोग झालाय याचा अंदाज येतो. केव्हातरी ‘गीताबीज’ मनात रुजलं की, ते संस्कार संचित आपल्या कलेतून आणि विद्येतून पुढे प्रकट होतंच. ‘अभ्यासोनि प्रकटावे’ या समर्थांच्या उपदेशाप्रमाणे ‘काव्यगीते’त समर्थपणे प्रकट झाल्याचं दिसतं. राजगुह्य सांगताना ती म्हणते,

“हे पार्था,
सांगतो विज्ञान सोपे
अविनाशी धर्मयुक्त ज्ञान ।
बुद्धी गहाण संसारी ताण
अश्रद्धा नसे जाण ।।”

“हे पार्था, तू माझा सर्वात आवडता शिष्य आहेस, भक्त आहेस. मी तुला अत्यंत गोपनीय ज्ञान पुन्हा सांगतो. श्रद्धा नसल्यावर बुद्धीवर मायामोहाचा पडदा असल्यामुळे संसारात संकटांना सामोरं जावं लागतं.” अशा साध्यासोप्या निरूपणामुळे सामान्य वाचकांना गीतामाहात्म्य सहज समजू शकतं. ओघवती भाषा आणि आशयसंपन्न लेखनशैली यामुळे अवघड विषय उगाच विद्वत्तापूर्ण दुर्बोधतेनं सजवून आणखी अनाकलनीय करण्याचा अजिबात सोस नसल्यानं संपूर्ण ग्रंथ मोठा वाचनीय आणि मननीय झालाय. नित्य वाचनास आपल्या संग्रही ठेवावा इतका आवश्यकही आहे.

गीतारहस्य न सांगे नास्तिकासी
आवडे ना श्रवणासी।
दोष पाहे सदा मज रूपासी
तयासि ज्ञान हे फुकासी ।। अध्याय 18 ।।

मोक्षसंन्यासयोग सांगताना तत्त्वार्थज्ञानमंजिरीची ही केवळ एक झलक आहे. प्रथम कृष्णार्जुन संवादाचा हा मधुसंचय वेदव्यासांनी केला. ज्ञानेश्वरांनी त्याचा विस्तार केला. त्यांचा हा संक्षिप्त अवतार तेवढाच अप्रतिम असल्याची प्रचीती येते. कवयित्री म्हणते,

“जे थोडी शंका मनात आणतात, ते महामूर्ख, अज्ञानी ज्ञानाला मुकतात. ज्ञानी आणि अज्ञानी त्यांच्या स्वभाव गुणधर्माप्रमाणे कर्म करत असतात. त्यांच्या हाती काहीच नसतं. कारण ते आपल्या स्वभावाच्या अधीन असतात.” आपण म्हणतो, स्वभावाला औषध नाही! ‘गीताज्ञान’ हे उत्तम औषध आहे. मात्र तत्त्वांची पथ्यं कटाक्षानं पाळावी लागतात. आचरणात गीता नसेल तर जन्ममरणाचे फेरे उरलेले असतातच, जीवनयज्ञ मृत्यूपर्यंत संपत नाही. रात्रंदिवस युद्धाचे प्रसंग येत राहतात. हे सगळं ठाऊक असूनही माणूस पाप का करतो ? या प्रश्नाचं उत्तर देताना कवयित्री नोंद करते, ‘कापोधादीवर भाष्य करते…

धुराने अग्नी, धुळीनं आरसा,
वारेने गर्भ, तैसे कामाचे आच्छादन।
अतृप्त कामाग्नपी ज्ञान करी भस्म
शत्रू हा मोठा विलक्षण ।।
मोहास कारण कामाचे
असती ज्ञानावर आवरण ।
इंद्रिय, मन, बुद्धी निग्रह कर
कामाचं कर तू हनन ।। अध्याय 3 ।।

प्रत्येक कडव्यात यमक साधल्यानं याचा नित्यपाठ करणं आणि स्मरणात ठेवणं श्रद्धावंताला सहजपणे साध्य आहे. यातील विषयवृक्षाचा उल्लेख करणं आवश्यक आहे.

दुसऱया अध्यायात सांख्ययोगाचा विस्तार कसा केलाय, पहा – श्रीकृष्ण उपदेश करताना ज्ञान आणि कर्मयोगाचा अर्थ सांगतो. तिसरा मुद्दा आहे ब्रह्मानंदाचा. या तिन्ही फांद्यांना आत्मा, देह, स्थिर बुद्धी, समभाव, निर्मोही, ब्राह्मीस्थिती ही फळं लगडलेली आहेत.

प्रत्येक अध्यायाचं चिंतन करताना शब्दांच्या दीपमाळा अंतरीचा गूढ गाभारा उजळवून टाकतात, उन्मनीचं लावण्य प्रज्ञाचक्षूंना दर्शन देऊन तृप्त करतं, तूर्येचं तारुण्य मोक्षाच्या एकांताला लाभतं, देहाकृतीची मूस युक्तीच्या मुद्रा तयार करण्यास सबळ होते आणि अभ्यासाचं नाणं खणखणीत होतं!

काव्यगीता
लेखिका: वंदना जालिंदर ताम्हाणे
प्रकाशक : साईश इन्फोटेक, पुणे
पृष्ठे : 160, मूल्य : 250/- रुपये