एका अभिजात युगाचा मागोवा

>> मल्हार कृष्ण गोखले

आपला हा महाराष्ट्र ‘राकट देशा, कणखर देशा’ म्हणून प्रसिद्ध आहे. तरीही अभिजात कला असे ज्यांना म्हणता येईल, अशा चित्रकला, शिल्पकला आणि साहित्य या ललित कला महाराष्ट्रात खूप विकास पावल्या. अजिंठय़ाची चित्रकला आज एक हजार वर्षांनंतर आणि वेरूळच्या कैलास लेण्यांची शिल्पकला आज आठशे वर्षांनंतरही पाहाणाऱयाच्या दृष्टीला थक्क करून सोडते. शब्दकला – साहित्य म्हणजेच काव्य हे ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत उदंड निर्माण झाले. परंतु संगीत ही कला मात्र इथे तितकीशी विकसित झाली नसावी, असे दिसते. महाराष्ट्राला आणि मराठी मनांना एक तर पंढरीच्या वाळवंटातले टाळमृदंगांचे संगीत मोह घालायचे; किंवा मग भाला- बरची आणि तलवारी यांच्या मर्दानी खणखणाटांचे तरी.

ही स्थिती मराठेशाहीच्या उत्तरार्धात बदलू लागली आणि इंग्रजी राज्याच्या प्रारंभकाळात तर पूर्णपणे बदलली. ज्याला आज आपण हिंदुस्थानी संगीत पद्धती या नावाने ओळखतो, त्या पद्धतीने शास्त्रीय रागदारी संगीत पेश करणारे अनेक थोर कलावंत उत्तर हिंदुस्थानातून महाराष्ट्रात आले. तसेच हे अभिजात संगीत आपल्याला आले पाहिजे, अशा जाणीवेने अनेक मराठी तरुण उत्तर हिंदुस्थानात गेले. पुराणांमधल्या ऋषिपुत्रांप्रमाणे ते गुरुगृही राहिले. त्यांनी वाटेल ते कष्ट उपसले आणि ती दैवी विद्या आत्मसात केली. त्यापैकी काही जण उत्तरेतच राहिले. काहीजण महाराष्ट्रात परतले. पण सर्वांनीच ही विद्या सुपात्र शिष्यांना देऊन महाराष्ट्रात नवनवीन संगीत परंपरा निर्माण केल्या. लाहोर, अमृतसर, पतियाळा, ग्वाल्हेर, इंदौर, लखनौ, बनारस, जयपूर, आग्रा अशा मुघलकालीन आणि मराठेकालीन संगीत पीठांमधली अभिजात संगीत गंगा त्यांनी मुंबई, पुणे, नाशिक, कुरुंदवाड, सांगली, मिरज, कोल्हापूर अशा मराठी नगरांमधून मुक्तपणे वाहवली. आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर-अंत्रौली आणि किराणा ही या संगीतामधली अव्वल घराणी. पण त्यांचे महान गायक-वादक हे त्या-त्या शहरांमध्ये राहात नव्हते; तर महाराष्ट्रात राहात होते. महाराष्ट्र खरोखरच भाग्यवान.

अंजली कीर्तने या महाराष्ट्रातल्या एक नामवंत अभ्यासक, संशोधिका, लेखिका आहेत. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हे संगीत क्षेत्रातले एक महान ऋषीच होते. त्यांचे चिरंजीव बापूराव पलुस्कर म्हणजे तर संगीत क्षेत्रातला एक चालताबोलता चमत्कार होता. हिंदुस्थानी रागदारी संगीताची स्वर्गीय गंगा ज्यांनी प्रथम महाराष्ट्रात आणली, त्या पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म १८४९ सालचा.

त्यामुळे लेखिकेच्या मनात १८४९ ते १९५५ असा साधारण शतकभराचा काळ हा सुवर्णयुग म्हणून ठसला. या सुवर्णयुगाच्या धुरंधर मानकऱयांच्या पराक्रम खुणा पार पंजाबातल्या अमृतसर, जालंदर, पतियाळापासून पूर्वेला कोलकात्यापर्यंत नि दक्षिणेत तंजावरपर्यंत पसरल्या होत्या. लेखिकेने या सर्व ठिकाणांना जातीने भेटी दिल्या. अनेक जुन्या-नव्या रसिकांच्या, अभ्यासकांच्या, संग्राहकांच्या भेटी घेतल्या. भरपूर अभ्यास केला. त्यातून प्रथम डिसेंबर २०१० मध्ये ‘गानयोगी’ आणि ‘संगीताचं सुवर्णयुग’ हे लघुपट निर्माण झाले. शिवाय ‘गानयोगी पंडित द. वि. पलुस्कर’ हा ग्रंथही अवतरला. पण एवढे होऊनही लेखिकेकडे अजून भरपूर साहित्य शिल्लक होते. इतके मौल्यवान की, जे अभिजात संगीताच्या रसिक वाचकांसमोर आलेच पाहिजे. त्यातून प्रस्तुत ‘अभिजात संगीताचं सुवर्णयुग’ हा अत्यंत माहितीपूर्ण असा संदर्भग्रंथ निर्माण झाला आहे. अखेरीस संदर्भांची यादी आहे.

ज्यांना ज्यांना म्हणून संगीत या विषयाची आवड आहे त्यांनी आवर्जून वाचावा आणि अगत्याने संग्रही ठेवावा, असा हा सरस नि सुरस ग्रंथ बनला आहे. दोषच काढायचा तर एवढेच म्हणता येईल की, लेखिकेची भाषा अभिजात संगीताबद्दल लिहिताना ज्या वजनाने आणि नजाकतीने यायला हवी होती, त्या ऐवजी जरा वर्तमानपत्री झाली आहे. कृष्णधवल छायाचित्रेही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक देखणी करायला हवी होती.

अभिजात संगीताचं सुवर्णयुग
लेखिका – अंजली कीर्तने
प्रकाशक – नावीन्य प्रकाशन, पुणे
पृष्ठ – २६८
मूल्य – ३३० रुपये