अध्यात्माचा आकृतिबंध

>> ज. दा. शहापूरकर

चिंतनीकार सन्माननीय प.पू.बा.भो. शास्त्री यांची अलीकडेच प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासनाचा ख.ना. आपटे पुरस्कार प्राप्त ‘झांजर’ कादंबरी हातात आली. ब्रह्मविद्येचा गाभा म्हणजे महावाक्य हा या ललित कादंबरीचा विषय आहे.

कादंबरीतील कथानकाला एक सामान्य पार्श्वभूमी आवश्यक असावी लागते. त्याचप्रमाणे कथानकातील प्रत्येक महत्त्वाच्या घटनेला तेवढय़ापुरती स्वतंत्र अशी पार्श्वभूमी आवश्यक असते. यालाच ‘भोवतालचे वातावरण’ असे म्हणतात. हीच वातावरण निर्मिती होय. प्रस्तुत कादंबरीत अशी वातावरण निर्मिती झालेली आहे. लेखकाचे हे पहिले यश आहे. महावाक्यावरील विश्लेषण हा या कादंबरीचा विषय प्रतिपादित असताना लेखकाने कमालीची वातावरण निर्मिती केलेली आहे. भव्य मंडप, व्यासपीठावर प्रवाचकासाठी केलेले सुंदर सिंहासन, श्रद्धाभावाने आलेला अच्युतांचा मेळावा, सनई चौघडय़ांचं मंगल वाद्य, मंडपाच्या बाहेर पुस्तक विक्रेत्यांची थाटलेली दुकाने, सुरुवातीला गीतापीठांचं मंगल व सात्त्विक पठण या सर्व वर्णनातून एक आध्यात्मिक पार्श्वभूमी लेखकाने चितारलेली आहे. प्रत्येक घटनाप्रसंगाला तेवढय़ापुरती स्वतंत्र आध्यात्मिक पार्श्वभूमी देऊन लेखकाने एक शब्दचित्र साकारलेले आहे.

अनेक प्रसंगांची चतुराईने केलेली मांडणी किंवा गुंफण म्हणजे ललित कथा होय. या कथेत मोजकीच पात्रे आहेत. सागर आणि आरती या प्रमुख पात्रांसोबतच सरला, अन्ना, नीरज, प्रतीक, समीर ही दुय्यम पात्रेसुद्धा वावरताना दिसतात. पू. शास्त्राच्या या ‘झांजर’मधून कथानकाद्वारे व्यक्ती निर्माण झाल्या नाहीत, तर व्यक्तींकडून कथानक निर्माण इत्यादी झाले आहे. कथानकाचा विषय व त्याची कलात्मक मांडणी करण्यावर कथानकाचे महत्त्व असते याचे भान पू. शास्त्रानी ठेवून सर्व प्रसंगांत एकसूत्रता ठेवलेली आहे हे त्यांच्या कादंबरीचे दुसरे यश म्हणावे लागेल.

संग्राम हा ललित कथेचा आत्मा असतो असे म्हटले जाते, नव्हे तो ललित कथेचा अविभाज्य घटक असतो. दोन किंवा अधिक विरोधी शक्ती तेव्हा संग्राम किंवा संघर्ष उत्पन्न होतो. असा संग्राम पाहण्यात, वाचण्यात मन रमते हे निसर्गसिद्ध आहे. सौंदर्य आणि रंजकता हेच तर कादंबरीचे उद्देश असतात. नदीच्या पाण्याचा प्रवाह एकाच बाजूने वाहत आहे हे पाहताना कोणता आनंद होणार? पण समजा दोन प्रवाह परस्परविरुद्ध येऊन मिळताना होणारा नाद मनमोहक ठरेल, आनंददायी ठरेल म्हणूनच झुंज किंवा संग्राम आनंद देणारा असतो. व्यक्ती-व्यक्तीमधला संघर्ष हा उथळ असतो, कमी प्रतीचा असतो. परिस्थिती आणि व्यक्तीमधील संघर्ष हा पहिल्यापेक्षा जास्त परिणामकारक असतो. एकाच व्यक्तीच्या दोन विचारांमधील संघर्ष हा त्याहीपेक्षा जास्त प्रभावी असतो. दोन व्यक्तींच्या परस्परविरुद्ध विचारांचा संघर्ष हा त्याहीपेक्षा जास्त प्रभावी असतो. प्रस्तुत कादंबरीत असाच वैचारिक संघर्ष आढळून येतो. आरतीने किंवा इतर पात्रांनी घेतलेल्या शंका आणि त्या शंकांचे सागरने केलेले निराकरण हाच या कादंबरीतील वैचारिक संघर्ष आहे आणि तो अत्यंत प्रभावी, रंजक आणि आनंददायी ठरला आहे हे या कादंबरीचे यश म्हणावे लागेल.

समर प्रसंग हा कोणत्याही ललित कृतींचा गाभा असला तरी व्यक्तिदर्शन आणि कथानक यांच्या कलात्मक चौकटीत त्याला बसविल्याखेरीज त्या कलाकृतीत सौंदर्य निर्माण होणार नाही म्हणून व्यक्तिदर्शन चातुर्यही महत्त्वाचे असते. कारण कथानकातून व्यक्ती निर्माण होत नसतात तर व्यक्तिदर्शनातून कथा साकार होत असते. व्यक्तीचा विचार आणि कृती तिचा स्वभाव सांगत असताना पू. शास्त्रानी कमालीची दक्षता बाळगलेली आहे आणि त्यामुळेच या कादंबरीतील व्यक्तिरेखा जिवंत आणि प्रभावी साकारण्यात त्यांना यश आलेले आहे.

या कादंबरीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे लेखकाचे संवाद चातुर्य व्यक्ती-व्यक्तींच्या संवादातून कथानकाला विषयाला पुढे पुढे नेणे व त्या संवादाद्वारे वाचकाला अप्रतिम आनंदाची मेजवानी देणे हीच चांगल्या संवाद कौशल्याची कसोटी असते आणि फलश्रुतीदेखील! पू. शास्त्राच्या या कादंबरीत संवादांची रेलचेल आहे. संवाद कौशल्यानेच त्यांच्या व्यक्तिरेखांना (विशेषतः सागरच्या) झळाळी आलेली आहे. कोणत्या पात्राच्या तोंडी कोणते संवाद घालावे याबाबतची पूर्ण जाणीव लेखकाने ठेवली आहे. हीसुद्धा त्यांच्या कादंबरीची यशस्विताच आहे यात संभ्रम नाही. कादंबरीचा विषयच गहन आहे म्हणून संवाददेखील गहनच असणार; परंतु विषयाला हलके करण्याचे कसब पू. शास्त्रा यांच्या लेखणीत असल्यामुळे कादंबरी कंटाळवाणी होत नाही. महावाक्य म्हणजे ज्ञानीयांचा प्रांत, थोरलं वाक्य हे थोरा-मोठय़ांचे. याला शह देत तेही आपलंच आहे हा आपुलकीचा भाव निर्माण करणारी ही कादंबरी आहे यात शंका नाही. सर्वसामान्यांना समजेल, रुचेल व वाचकदेखील क्लिष्ट विषय समजल्यामुळे मोहरून जाईल.

पू. शास्त्राचं कोणतेही पुस्तक वाचायला घेतलं की, मला आचार्य रजनीशांची आठवण येते. आपला विषय मांडत असताना लौकिकातील अनेक उदाहरणे व दाखले देतात आणि वाचकाला आपल्यासोबत कुशलतेने ओढत नेतात. त्याचप्रमाणे पू. शास्त्रासुद्धा आपला विषय मांडत असताना अनेक दाखले देऊन वाचकांना संमोहित करतात, मंत्रमुग्ध करतात हा त्यांच्या लेखणीचा खास विशेष आहे.
‘झांजर’ ही कादंबरी अनेक अंगांनी वैशिष्टय़पूर्ण आहे. रसिकांनी, मर्मज्ञांनी, संतांनी, महंतांनी ती जरूर वाचावी, जवळ बाळगावी. महाराष्ट्र राज्याची मान्यतेची मोहर प्राप्त झालेली आहेच. झांजर म्हणजे शब्दामृताचा न रिता होणारा घट. त्यातील अमृत कितीही प्यावे आणि तृप्त व्हावे. पू. शास्त्रानी अशा एकापेक्षा एक सरस कादंबऱया यापुढेही द्याव्यात.

झांजर
लेखक – बा. भो. शास्त्री
पृष्ठ – १७६
किंमत -२००
फ्रकाशक – आदित्य प्रकाशन