वाचावे असे काही-शोध एका संताचा

<<[email protected]>>

संत चोखामेळा यांच्या ६६९ व्या स्मृतिदिन सोहळय़ानिमित्त नुकतेच मंगळवेढा येथे ‘जोहार चोखोबा’ या ग्रंथाचे संत चोखोबांच्या समाधीसमोर प्रकाशन झाले. नाग-नालंदा प्रकाशित या पुस्तकाचे संपादन संत साहित्याचे अभ्यासक सचिन परब व श्रीरंग गायकवाड यांनी केले आहे. संत चोखामेळांविषयी सर्वार्थाने अभ्यास मांडणारे हे पुस्तक. ‘जोहार चोखोबा’चे प्रकाशक डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी पुस्तकाविषयी मांडलेलं हे मनोगत.

पुस्तकाचे नाव- जोहार चोखोबा

संपादन-सचिन परब,श्रीरंग गायकवाड, प्रकाशन-नाग-नालंदा प्रकाशन, इस्लामपूर, मूल्य-२३० रुपये, पृष्ठ-२६३

मध्ययुगीन महाराष्ट्रातला खराखुरा मानवताधर्म म्हणजे वारकरी संप्रदाय! लोकोत्तर प्रतिभेचे संत नामदेव आणि कारुण्यमय प्रज्ञा असणारे ज्ञानदेव यांच्या अथक प्रयत्नांतून या संप्रदायाचा पाया रचला गेला. आपल्या क्रांतिकारी कार्याचे नेमके भान असणाऱया नामदेवांनी ज्ञानदेवादी भावंडे, गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, जनाबाई आणि चोखामेळा परिवार अशी मांदियाळी जमवून चंद्रभागेच्या वाळवंटात नवा डाव मांडला, नवे रिंगण धरले. त्यातूनच मध्ययुगात भक्तींची आणि अभिव्यक्तीची पहाट उगवली. त्याचा लखलखीत आणि चमत्कारसदृश आविष्कार म्हणजे संत चोखामेळा होय.

यादव काळ हा कर्मठ ब्रह्मवृंदाचा प्रभाव असणारा काळ होता. या काळात राजसत्ता यज्ञ आणि क्रतेउद्यापने यामध्ये गुंतली होती तर अठरापगड जातींचा कृषक समाज बहुदैवतवादाच्या जंजाळात गुंतला होता. अशा काळात अस्पृश्य जातीतून एका सत्शील व्यक्तिमत्त्वाचा उदय व्हावा आणि नामदेवांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारावे, संतमंडळात स्थान द्यावे हे सारेच अलौकिक होते. चोखामेळा हा परंपरेने गावकीच्या कामात अडकलेला, पण वृत्तीने साधू. शुद्ध वाणी, शुद्ध वर्तन, परिस्थितीच्या दलदलीतून बाहेर पडण्याची तळमळ. त्यातूनच चोखोबा पंढरपूरच्या वाळवंटात चालणाऱया नामदेवांच्या भजन-कीर्तनात रंगला. त्याच्या वृत्तीत आमूलाग्र बदल झाला आणि एका अंत्यजाचा संतत्वाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. एका संताच्या जडणघडणीचा हा प्रवास अभ्यासकांना संशोधनातून खुणावत होता. त्यातूनच ‘रिंगण’चा 2015चा आषाढी विशेषांक संत चोखामेळांना वाहिला गेला. त्या विशेषांकात काही मौलिक भर घालून सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड या तरुण धडपडय़ा अभ्यासकांनी ‘जोहार चोखोबा’ या ग्रंथाचे संपादन केले आहे. तर इस्लामपूरच्या नाग-नालंदा प्रकाशनाने अत्यंत देखण्या स्वरूपात व सुबक शैलीत हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.

या ग्रंथात चोखोबांना ‘संस्कृतीच्या पायातील तडा’ संबोधणारे भालचंद्र नेमाडे, ‘संत आणि साहित्य’ याचा अनुबंध स्पष्ट करणारे डॉ. सदानंद मोरे, ‘निरुत्तर करणारं प्रश्नोपनिषद’ अशी चोखोबांची भलावण करणारे अभय टिळक यांच्यापासून ‘आम्ही चोखाबा का नाकारतो?’ ते स्पष्ट करणाऱया ज. वि. पवारांपर्यंत 30-32 अभ्यासकांचे अभ्यासपूर्ण लेख येथे एकत्र करण्यात आले आहेत.

या पुस्तकात आजच्या संदर्भात चोखोबांचे स्थान शोधण्याचा प्रयत्न करणारे सुकृत करंदीकर, राजेश शेगोकार, नीलेश बने, प्रशांत जाधव  यांचे लेख आहेत. मंगळवेढा ही चोखोबांची कर्मभूमी, मेहुणपुरा ही जन्मभूमी, पालखी सोहळय़ातील त्यांचे स्थान यासंदर्भातील हे रिपोर्ताज आहेत. आ. विवेक पंडित यांचा ‘वेदनेचे कॅथार्सिस’ हा लेख अंतर्मुख करतो. त्याचवेळी भारतकुमार राऊत, पराग पाटील, अरुण खोरे हे चोखोबाविषयक अभ्यासाच्या काही दिशा स्पष्ट करतात.

ह.भ.प. निवृत्तीबुवा गायकवाड यांचे अनुभवकथन तर आजची भक्तीची, वारीची पायवाट कशी खाचखळग्यातून जाते ते स्पष्ट करते. चोखोबा संत असले तरी त्यांचा अभंग कीर्तनासाठी घेतला आहे असे सहसा घडत नाही. वाळवंटातील आध्यात्मिक लोकशाही अजून सर्वदूर पसरायची आहे. याचे लख्ख भान हा संदर्भग्रंथ देतो. चोखोबा समजून घ्यायचे असतील तर हा ग्रंथ मुळातून वाचला पाहिजे. अन्वर हुसेनच्या मुखपृष्ठापासून रंगनाथ पठारेंच्या कथेपर्यंत खूप महत्त्वाचा दस्तावेज येथे आपणास सापडू शकतो.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या