एका Writerची तरल लेखणी

>>डॉ. विजया वाड

ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिकांचे आत्मचरित्र करुळचा मुलगा. मधुभाईंच्या जगण्याच्या प्रत्येक टप्प्याचे संवेदनशील वर्णन म्हणजे हे पुस्तक. आत्मचरित्र हा साहित्य प्रकार कादंबरी, कथा, कविता, नाटक या साऱ्या कल्पितांना ओलांडून जाणारा असतो. लेखकाचं प्रत्यक्ष आयुष्य हे त्यामध्ये येतं. त्याबद्दल लिहिणं हे विलक्षण कठीण, जोखमीचं, जबाबदारीचं असतं.

करूळचा मुलगा हे मधू मंगेश कर्णिक यांचं आत्मचरित्र आहे. त्यांची लेखणी मराठी सारस्वतास सुपरिचित आहे. मधू मंगेश कर्णिक यांचे बालपण कसे होते? ‘बालपणीचे काटे व फुले’ या प्रकरणात ते उलगडते. मंगेशदादा हे वडील नि आतेबाय ही आई. मंगेशदादा वारले तेव्हा मधू जेमतेम साडेचार वर्षांचा होता. मोठा भाऊ बाबू नोकरीत होता. तोच काय तो आतेबायला आधार. आठ वर्षांचा असेतो छोटा मधू शाळेतच जात नव्हता. शेवटी बाळय़ा बामणाने मारझोड करीत कसेबसे शाळेला पाठवले. मधूभाई लिहितात, आईला करुणा आली, ‘‘बाळा, मारू नको रे त्याला. समजुतीने घे.’’

‘‘ग्ये, समजुतीनं घेवक् तो आता न्हान आसा? घोडो झालो तरी शाळेत जावक् नको! बामणाचा नाव बुडवलान भोसडीच्यान.’’ आणि पाठोपाठ कुल्ल्यावर एक लिंगडीची शिरटी. माझी ‘ठो ठो’ बोंब आणि तिकडे आतेबायचा जीव कळवळलेला. अशी माझी शाळेची वाटचाल सुरू झाली. मास्तर म्हणाले, ‘‘याची जन्मतारीख काय घालायची? बामणाचा पूर्ण सात वर्षाचो पोर बिगरीत याला पयलीत बशिवतो.’’ बाळा बामण म्हणाला, ‘‘बसवा’’. ‘‘जन्मतारीख काय घालायची?’’… ‘‘तुम्हीच काय ती घाला’’. मास्तरांनी बोटे मोडून हिशेब केला. पाच वर्षे पूर्ण झालेला विद्यार्थी शाळेत दाखल करीत. मी 15 मे 1938 ला शाळेत दाखल झालो. मास्तर बोटे मोडून पाच वर्षे मागे गेले आणि 1933 हे जन्मसाल ठरवून मोकळे झाले. अशा प्रकारे 28 एप्रिल 1931 साली जन्मलेला आतेबायचा मुलगा बामणाला आणि करूळच्या शाळा मास्तरांना देऊन कसातरी शाळेत गेला.

पण वडिलांचा एक गुण अनुवंशिकतेने मधूने उचलला. पुस्तकं वाचण्याचा नाद! आणखी एक गोष्ट होती. आई अशा अद्भुत गोष्टी रंगवून सांगायची की, त्या अशिक्षित बाईचा ‘कल्पकतेचा गुण’ काही अंशी आपल्यात उतरला तो गोष्टी लिहिण्यासाठीच असंही लेखकाला वाटतं. साने गुरुजींचा मोठा पगडा मधूभाईंवर होता. ते वारले तेव्हा त्यांनी कविता लिहिली होती. ‘लाडक श्याम मग निजला’ आणि ‘बालसन्मित्र’ने या शाळकरी मुलाची कविता चक्क छापली हो!

बालपणीचे काटे म्हणजे बापाचा चिरविरह, शाळेत जावे म्हणून सोसावी लागलेली मारहाण, घरावरला दरोडा, सोन्याच्या सल्ल्यांच्या हट्टात हातोहात झालेली फसवणूक अन् फुले म्हणजे शशीचे आयुष्यात झालेले आगमन, जी मोठेपणी त्यांची पत्नी झाली. बाबूचे तरुणपणी देह ठेवणेही जीवघेणेच अन् आईचे जाणे हा सर्वात मोठा सल. आपल्या ‘लागेबांधे’ या पुस्तकात लेखकाने त्यावर सविस्तर लिहिले आहे.

‘आयुष्याची सोबत शशी’ हे प्रकरण अतिशय रोचक झाले आहे. ‘बघण्यातून बोलणारे डोळे’ शशीचे होते हे वाक्य मनास भावते नि आपणांस लेखकाची सौंदर्यजाण सांगते. ‘एक होता रायटर’मध्ये एसटीतल्या नोकरीचे वर्णन बहारदार आहे. मुळात ‘रायटर’ची नोकरी म्हणजे काय ते वाचकांनी प्रत्यक्षच वाचावे. 3 मे 1958ला मनोहर ग्रंथमालेने मधूभाईंचे पहिले पुस्तक साहित्य संमेलनात काढले आणि त्यास पुलंनी सुंदर प्रस्तावना दिली.

सचिवालयातला सहावा मजला म्हणजे मुख्यमंत्र्यांचे दालन. गॅझेटेड ऑफिसर लेखक. गोवा टु मुंबई स्थलांतर, डिग्री नसताना गॅझेटेड ऑफिसर म्हणून काम करणे, त्यासाठी वेगळा जीआर निघणे. हा खरेच दैवी चमत्कार वाटतो अन् लेखक असण्याचा सन्मान वाटतो. त्या काळात लेखकाची ‘माहीमची खाडी’ गाजत होती. एक ज्येष्ठ अधिकारी म्हणाले, ‘तुम्ही मुख्यमंत्र्यांची भाषणं लिहिता; पण कादंबरी लिहिण्याएवढं ते सोपं नसतं.’’ तेव्हा न कचरता लेखक म्हणाले, ‘‘साहेब, माझ्या कादंबरी लेखनाचा इथे काही संबंध नाही. नोकरीची गरज म्हणून मी इथे आहे. माझ्या साहित्याची उंची तुम्ही मोजू नका. तो तुमचा प्रांत नाही. सचिवालयाचे सहा मजले त्यासाठी कमी पडतील.’’ मुळात ऋजू स्वभाव, पण प्रसंगोत्पात आतली नस दुखावली की असेही घडते! अनेकानेक मानसन्मान, राज्य, राष्ट्रीय, पुरस्कारांनी ते वलयांकित आहेत. पण कधी उतणे, मातणे घडले नाही. लौकिकार्थाने ते तृप्त आहेत. दोन पुत्र, कन्या, नातवंडे, जावई आणि पत्नीची लाभलेली क्षमाशील साथ! ते म्हणतात, ‘‘साहित्याचा निर्मितीकार म्हणून मी या संस्कृतीचा अणुमात्र वारस. संस्कृतीचा अंश सापडावा आणि विकृतीचा नाश व्हावा म्हणून धडपड’’ असे हे निर्मळ आयुष्य. आनंदाची संध्याकाळ अनुभवणारे! अवश्य वाचा, समृद्ध व्हा!

करूळचा मुलगा
लेखक – मधू मंगेश कर्णिक
प्रकाशक – मौज प्रकाशन
मूल्य – रु. 350/-; पृष्ठ – 400

[email protected]