संवेद्य कल्लोळ

1

>> प्रो. डॉ. शशिकांत लोखंडे

श्याम ऊर्फ शांताराम महादेव पेंढारी हे नाव मराठी साहित्यविश्वात एक लक्षणीय दखलपात्र नाव आहे. ते कवी, कादंबरीकार आणि ललितनिबंधकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘काव्यगंध’ या कवितामंचाचे ते 1995 पासून संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी 1979 नंतर अनेक कविसंमेलनांत सहभाग घेतलेला आहे.

स्वभावतः ते कवी वृत्तीचे असल्याने ते जानेवारी 2000 पासून गेली एकोणीस वर्षे कवितेला प्राधान्य देणारे कुसुमाकर या मासिकाचे ‘सबकुछ’ संपादक आहेत. दरमहा नियमितपणे प्रकाशित होणारे ‘कुसुमाकर’ हे आता अनेक जुन्या-नव्या कवींचे आश्रयस्थान झाले आहे. संपादकाच्या कुशलतेमुळे प्रत्येक अंक वाचनीय, चिंतनीय आहे. दरमहा वाट पहावी असे त्याचे अंतरंग आहे. कुसुमाकर म्हणजे नव्या काळातील अग्रणी चळवळ आहे. श्याम पेंढारी यांनी कोणतेही प्रलोभन न स्वीकारता अल्पशा वर्गणीदारांच्या सहकार्यावर अथक परिश्रम घेऊन प्रत्येक अंक सजीव केला आहे. जाहिरातीच्या नादाला ते लागले नाहीत किंवा ‘कुसुमाकर’ मोडीत निघेल असे कोणतेही लाघवी धोरण स्वीकारलेले नाही. एक कलावादी संपादक म्हणून मीही त्यांना ओळखतो. संपादकाची कुशलता मुखपृष्ठांची स्वतंत्र जात, मांडणीचे कौशल्य यामुळे ‘कुसुमाकर’ आज साहित्यविश्वात सन्मान्य आहे.

श्याम पेंढारी यांनी आतापर्यंत आपले, प्राजक्त (1989), मातीचे घर (2000) हे दोन कवितासंग्रह प्रकाशित केलेले आहेत. आणि अलीकडे अभिव्यक्ती प्रकाशन, नवी मुंबईतर्फे 5 जून 2016 रोजी त्यांचा मैत्रीचा गाव हा तिसरा कवितासंग्रह प्रकाशित आहे. काव्य व जीवन जाणिवांची संमिश्रता आणि आविष्काराची साधी उत्कटता आणि समाजाचे भान यामुळे खरंच या कविता ‘मैत्रीचा गाव’ झाल्या आहेत. वाचताना समान धर्मीयत्वाचा प्रत्यय देणारी त्यांची शैली अस्सल गावरान आहे. जे जे जाणवले ते ते काव्यबद्ध करून त्यांनी मानसदृष्टय़ा आपली सार्थता साधली आहे. कवितेत कुठेही शब्दच्छल, भारी आलंकारिकता नाही, अनावश्यक तपशील, बोजड शब्द कवित्वाचा उग्र दर्प यापासून हा गाव ‘विमुक्त’ आहे. कवीला कुठेतरी आदिमतेविषयी ओढ आहे. याचा प्रत्यय त्याच्या ‘मैत्रीचा गाव’मध्ये आहे. क्वचित प्रसंगी पद्याला मुक्त अवसर देऊन ते आशयाचे सौंदर्य गठन करतात. बोलभाषा हा या कवितांचा प्रकृतीधर्म आहे. इतरांच्या कविता समजून घेताना त्यांनी कुणाचेही लेखनानुकार केलेले नाही. स्वयंप्रज्ञा हे त्यांच्या प्रतिभेचे बळ आहे. संवादीपणानं अनुभूती व्यक्त करताना ते तिरकसपणा मुद्दाम टाळतात. त्यामुळे त्यांची कविता ‘दाखवेगिरी’पासून चार हात लांब राहते. मुळात ती तिच्या प्रकृतीत अस्सल आशयामुळे तिला वैभवापेक्षा स्वत्वाचे तोरण शोभले आहे.

भावनांचा कल्लोळ आणि दुःख घेऊन हा कवी शोध घेत या मैत्रीच्या गावात आहे. बालपणाच्या आठवणींपासून मरणाच्या स्मरणापर्यंत ही कविता वाटचाल करते. निसर्गाची विविध रूपे टिपते. या कवितांना स्वत्वानुभूतीची जोड आहे. जीवनातील वैषम्य (बेरोजगारी) कविता दुःखी करते. जीवनातील मांगल्य संपवणारे घटक, कविता चित्रीत करते. त्यात ‘प्रेमाचीही हाक’ ही कविता अबोलपणे देते. पाऊसही जीवघेणा व्हावा हे विपरीतच. ‘हा बेफाम कोसळणारा पाऊस! जशी माणसं माणसांचं वैर…’ कविता कधी कधी व्यक्तिगत स्तरावरच्या अनुभवांपर्यंत येतात. उदा. ‘श्रावण बैल’. काहीवेळा ‘मानसिकता’ उप्रेक्षापूर्णपण प्रासंगिक होते, कधी संज्ञा प्रवाहाचा आधार घेते. सखीच्या हृदयातील प्रकाश प्रेम देणारा नंदादीप कवी आयुष्यभर जोपासतो. सरळरेषेत चालणारा कवी ‘काळ’चे म्हणणेही ऐकतो-
काळ म्हणाला, चल मित्रा, निघायची तयारी कर
वेळ तुझी झाली आता, लवकर निरवानिरव कर

तरीही हृदयात तकलादू टाके घालण्यास कवीचा विरोध आहे. खाचखळग्याचं जीवन तो जगू पाहतो. रोजच्या अनुभवाचे चित्र, ‘रेल्वे होत जाते पोटुशी’मध्ये साकार होते. ‘टिळक’सारख्या कवितेत जीवनातील विपरीत, विसंगती कवी अनुभवतो. आयुष्याच्या सांजवेळी तर शून्याकडून शून्याकडे जाण्याची वेळ कवीला जाणवते. कधी गीतसदृश कविताही कवीचे प्रतिभा वैभव दाखवतात. ‘मैत्रीचा गाव’मध्ये कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा उत्स्फूर्त, उत्कट आविष्कार आहे. संवेदनाकूल मन आणि भोवतालचे वास्तव यानेच हे व्यक्तिमत्त्व आकाराला आले आहे. आणि या व्यक्तिमत्त्वाच्या आविष्काराला कविता हे माध्यमच पोषक आहे. विविध प्रकारच्या भावना, प्रतिमा, शब्द आणि अनुभवाचे भिन्न घटक यांनी रासायनिक प्रक्रिया ‘श्रावण बैल’, ‘नर मादी’, ‘मानसिकता’, ‘काळ म्हणाला’, ‘पारखा माणूस माणसाला’ या कवितांत आढळतात. हे कविमन अनुभवांच्या विविध घटकांना एकत्र आणून कवितेची संरचना करतं. तेव्हा कुठल्या तरी एका प्रबळ, उत्कट भावनेचाच आविष्कार होत असतो असे नव्हे तर सर्वच प्रक्रिया थ्ग्ही जेदहत्ग्tब् निरपेक्ष स्वरूपाची बनते. अनेक भाव, भावना, जीवनविषयक जाणिवा, निसर्गानुभूती हे सर्वच कल्पनेने निर्माण होण्यापेक्षा वास्तविकतेने घडून येतात. हे कवीच्या काव्य माध्यमाची ताकद आहे. दैनंदिन आयुष्य, स्वव्यक्तिमत्त्व, निर्मितीक्षण माध्यम या सर्वांचे मुक्तमेलन हा साध्या कवितेला नवार्थवाही बनवते. मात्र हा नव्या भावनांचा शोध नाही.

तर्कापलीकडील अनुभव नाही. हे कवीचं कार्यच नव्हे तर त्याचे मंथन, जुळणी, उन्नयन, परिवर्तन हे कवितेत साधले गेले आहे. भावच्छटा (feeling) ची अभिव्यक्ती हीच त्यांच्या कवितेची मर्यादा आहे. उदा. ‘त्याचं मर्तिक’, ‘चांदणं’, ‘मातीचे घर’, ‘सखे’, ‘एखाद्या शत्रूप्रदेशात’, ‘तुझ्या पावलांना’ इ.इ. अतित, वर्तमान, तात्कालिकता यावर कवीचे भान आहे. त्यामागे जीवनातील, समाजातील व्याधी म्हणजे जातीयता आणि ‘करप्शन’ (लाचलुचपत) हे पाहताना कवी अस्वस्थ होतो. हे त्याच्या जागृत मनाचे सुचिन्ह आहे. आपल्या देशात सुखापेक्षा दुःखाचेच प्रश्न अधिक आहेत. महागाई, शेतकऱयांच्या आत्महत्या, दहशतवाद, राजकीय दिवाळखोरी, लुटमार याशिवाय नवा दिवसच नाही. ‘जात नाही ती जात’, ‘जातीचे निर्मूलन’ या दोन कविता फक्त वास्तुवानुभवाशी थांबतात. त्यात वर्णनभाव अधिक आहे पण चिंतनाची डुब नाही. केवळ प्रतिक्रिया ही कविता होत नाही, ती मनाची समजूत होते हे कवीने भान ठेवले पाहिजे. कारण जात या घटकाचे अर्धनिर्णयन, इतिहास, अर्थशास्त्र, समाजसंरचना, वर्गप्राधान्य अशा अनेक स्तरावरून केले पाहिजे. या भाबडय़ा कवितांचा एक वर्ग आहे, असे म्हणता येईल.

या संग्रहाचे वर्णन डॉ. राम पंडित यांनी ‘भावविभोर मनाची शब्दयात्रा’ या अचूक शीर्षकाने केले आहे. ती समग्र कवितांत गद्यलक्षणात असलेल्या संवेदनशील अंतःकरणाची अनुभूती साकारते. हे त्यांचे कथन कवितांची दिशा दाखवते. गंधस्मृती, आठवणी, खंत, आंतर उदासिनता या साऱया विभ्रमाचे सुंदर रचनातत्त्व आहे. स्वप्नील मनोवृत्ती, नैतिक मूल्यांचा सोस मात्र प्रामाणिक आहे. एक सुसंस्कृत निर्भीड माणूस या ‘मैत्रीच्या गावात’ आहे हे विशेष होय. ‘मैत्रीचा गाव’ खरोखर संग्राह्य आहे. मराठी नव्या कवितेत त्यास अनन्यसाधारणत्व देता येईल एवढी चमक कवीच्या प्रतिभेत आहे. मी कवीला सुयश चिंतितो.

मैत्रीचा गाव (कवितासंग्रह)
कवी – श्याम पेंढारी
प्रकाशक – अभिव्यक्ती प्रकाशन
पृष्ठ – 72, मूल्य – 75