श्रमविनिमयाचे अर्थशास्त्र

>> माधुरी महाशब्दे

ज मानवाने विज्ञान तंत्रज्ञान, वैद्यक, सर्वच क्षेत्रांत बुद्धिमत्तेच्या बळावर मोठी झेप घेतली आहे. त्यातून भौतिक सुखसुविधा, साधनसंपत्ती सारे त्याच्यापुढे हात जोडून उभे आहे, पण त्याचा उपभोग समाजातील सर्व स्तरांतील लोकांना घेता येतो आहे का याचे उत्तर अर्थातच नकारार्थी आहे. एकीकडे अलोट संपत्ती, भौतिक सुखे आहेत तर दुसरीकडे कमालीचे दारिद्रय़. समाजातील ही विषमता दूर करता येईल का व कशी याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न ‘मुलांसाठी अर्थशास्त्र्ा’ या पुस्तकातून तेलुगू लेखिका रंगनायकम्मा यांनी केला आहे.

अर्थशास्त्र्ा हा विषय तसा गहन, समजण्यास कठीण, पण तेच अर्थशास्त्र आपल्या दैनंदिन जीवन व्यवहारातून सोपे करून दाखवण्याचे कसब पुस्तकात आहे. त्यासाठी लहान मुलांच्या (इ. ७ वी ते १० वी) विश्वात जाऊन त्यांना समजतील अशी उदाहरणे घेतली आहेत. दैनंदिन व्यवहार करताना पैसा हे चलन आपण वापरतो. पैसा म्हणजे काय, वस्तू म्हणजे काय? माणसांनी बनवलेली कोणतीही बाब म्हणजे वस्तू. त्या बनवण्यासाठी कच्चा माल, अवजारे, माणसे व त्यांचे श्रम यांचा अंतर्भाव असतो. विनिमय म्हणजे श्रमांचा विनिमय, एक वस्तू दुसऱयाकडे जाते ते त्या श्रमांचा विनिमय. श्रमांची देवाणघेवाण असते. शारीरिक श्रम, मानसिक श्रम, कुशल श्रम, अकुशल श्रम असे श्रमातील भेद आहेत. शारीरिक श्रमात विचार करण्याची गरज नसते. बौद्धिक श्रमात विचार करण्याची अधिक गरज असते. म्हणून बौद्धिक श्रमाचे मूल्य अधिक आहे.

मानवी संबंध हे केवळ रक्तसंबंध नसून श्रमसंबंध असतात. मालक – नोकर, गरीब – श्रीमंत असे भेदभाव निर्माण झाले आहेत. श्रीमंतांकडे सर्व सुखे, संपत्ती, तर गरीबांकडे दारिद्रय़, अन्नवस्त्र्ाांचा अभाव अशी असमानता का? मालमत्ताधारकांकडे नोकर, गुलाम राबतात. ही विकृत संस्कृतीपरंपरा आहे.

जर्मन अर्थशास्त्र्ाज्ञ कार्ल मार्क्सने श्रमांच्या शोषणाचे रहस्य शोधून काढले. श्रमांच्या शोषणामुळे सर्व साधने शोषक वर्गाची मालमत्ता बनली आहेत. त्यामुळे माणसामाणसातील श्रमसंबंध विरोधी नात्यांचे बनले आहेत. मुलांना समजेल अशा उदाहरणातून हे पुस्तकातून सांगितले गेले आहे. मालकवर्गाविरुद्ध शत्रुभाव नाहीसा व्हायला हवा असेल तर मालकांनी श्रमिकांसोबत श्रम करायला हवेत. कामगारवर्गाला यासाठी संघर्ष करावा लागेल. जेव्हा कामगारवर्ग श्रमांचे शोषण व ती संस्कृती नाहीशी करील तेव्हा तो साम्यवाद असेल.

‘मुलांसाठी अर्थशास्त्र’ हे पुस्तक मुलांनी जरूर वाचायला हवे. उद्या ही मुले तरुण होतील, विचार करायला लागतील. त्यांच्या मनात हे विचार योग्य वयापासून रुजतील. अनेक प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागेल. मानवी नाती, मानवी समाज समजण्यासाठी हे आवश्यक आहे. आपल्या देशात अनेक जाती, धर्म, पंथ, त्यांच्यातील भेदभाव, उच्चनीचता, अंधश्रद्धा, पर्यावरण, दारिद्रय़, गुन्हेगारी, संघर्ष अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. मुलांनी आपली जबाबदारी ओळखून काम करायला हवे.

मुलांसाठी अर्थशास्त्र
लेखिका – रंगनायकम्मा
अनुवाद – रूपेश पाटकर,
प्रकाशक – स्वीट होम पब्लिकेशन्स
पृष्ठ- ३६२
मूल्य – १२० रुपये