‘नाच गं घुमा’ – अवघड वळणांच्या खडतर वाटा…

1

>> डॉ. विजया वाड

प्रिय वाचकांनो, या पुस्तकाचा आस्वाद घेताना जुन्या स्मृती पुन्हा चाळवल्या जात आहेत.

तारीख 8-8-1988, स्थळ पुणे, चंद्रकला प्रकाशन. प्रमुख पाहुण्या शांताबाई शेळके. पुस्तक प्रकाशन सोहळा दोन पुस्तकांचा. माझं ‘अवेळ’ नि माधवी देसाई यांचं ‘नाच गं घुमा’, पण त्या रात्रीच माधवीबाईंची सगळी आवृत्ती कोणी तरी विकत घेतली. हे पुस्तक अन्य कुणी वाचू नये अशी इच्छाही त्यामागे असू शकते, पण आठच दिवसांत त्याची दुसरी आवृत्ती बाहेर पडली. हा लोंढा कसा थोपवणार? ‘अवेळ’नं मला साहित्य क्षेत्रात बस्तान बसवायला मोठी मदत केली आणि ‘नाच गं घुमा’नं इतिहास निर्माण केला. 8-8-88 ते 2013 पर्यंत तेरा आवृत्त्या. होय, माधवी रणजीत देसाईंची पत्नी होती. लोकांना दुसऱ्याचं ‘जगणं’ बघण्याचं… निदान त्यात डोकावण्याचं… किती कुतूहल असतं नाही का?

पण लेखिकेचं प्रामाणिक आत्मनिवेदन वाचून मन ते अंगभर पांघरून घेतं. स्त्रीच्या कपाळावरलं ते कुंकू तिला कोणता भोगवटा देईल याची तिला तरी कुठे कल्पना असते हो? साऱ्या अंधारातल्या उडय़ा. निमूट शरणागती नि अगतिक वाटचाल. लेखिका तर आक्रोशून म्हणते, ‘आता गळय़ात सौभाग्य अलंकार नसतो, पण कपाळावर लालभडक कुंकू असतं. ती निशाणी असते माझ्या प्रिय हिंदू धर्माची! अनेक रूपांत बदलत गेलेल्या हिंदुस्थानी स्त्री जीवनाची! ती कपाळावरची रक्तरंजित खूण असते! मी भोगलेल्या वेदनेची, शोकांची, सुखाची अन् मोहाचीही! मोहाच्या फुलांचा रंग लालच असावा बहुधा.
कु. सुलोचना भालजी पेंढारकर या नावानं वयाच्या नवव्या वर्षी शाळेत जायला लागलेली, ‘ताई’कडून ‘आई’कडे गेलेली, तीन भावंडं, दोघी तिघी आया, बाबा यांच्या सहवासात रमलेली लेखिका लहानपणीच्या गाभूळलेल्या चिंचेच्या आठवणी सांगते. त्यात वाचक खरोखर रमून जातो. भालजींची कंपनी त्यात सतत त्यांच्याबरोबर जाणाऱया आईबद्दलचे बालसुलभ कुतूहल, रंग लावलेली न लावलेली स्टुडिओतली माणसे, आधी बेळगाव ‘मग पुणे,’ अरुण चित्र बंद करून बाबा कोल्हापूरला गेले नि मग प्रभाकर चित्र सुरू झाले. तेव्हा कुटुंब कबिल्याचे झालेले स्थलांतर याचे हृदयंगम वर्णन खूप खरेपणाने लिहिले आहे.
आत्मचरित्र म्हणजे ‘जगले जशी’चा खरेपणाचा आलेख! मनुष्य प्रवृत्तीच अशी आहे की, दुसऱयाच्या खासगी आयुष्यात डोकावण्यात परमानंद वाटतो. त्यातून ज्यांची आयुष्ये सरधोपट असतात त्यांना तर दोन नवरे जिच्या आयुष्यात आले तिच्याबद्दल फारच कुतूहल वाटते. लेखिकेने ते उत्तमरीत्या रंगविले आहे.

या पुस्तकाचा कळसाध्याय म्हणजे रणजीत देसाई या महान लेखकाबरोबरचे सहजीवन. पहिल्या पतीचे निधन आणि पदरात तीन मुली. बाबा काय बरं म्हणाले, ज्या दिवशी रडायचं असेल तेव्हा खोलीचं दार बंद करून पोटभर रडून घे, पण बाहेर येताना प्रसन्न चेहऱ्याने बाहेर ये. रडणं फक्त तुझ्यासाठी आणि हसणं जगासाठी असू दे.’ बाईंच्या नोकरीमुळे जगण्याला ताठ कणा होता. शिक्षिका असल्याने मुलांचे अमाप प्रेम साथीस होते हाच काय तो आयुष्यातला झुळूझुळू पाट!

नंतर रणजीत देसाई जीवनात आले. त्यांनी लग्नासाठी किती आर्जवे केली. बाईंनी रणजीत देसाईंच्या मुली नि आपल्या मुली यांच्यात कधीही फरक केला नाही. रणजीत देसाई म्हणत, ‘तुझ्या मुली त्या माझ्याच मुली. समज, या मुलींनी आपल्याला मानलंच नाही तर… तरी काय झालं? त्यांचं जीवन वाहत आहे. यानंतर माझ्या दृष्टीने जगाची लोकसंख्या फक्त दोन! एक मी अन् होकार दिलास तर तू!’ अशी पत्रं माधवीबाईंना दरआठवडय़ाला नेमानं येत होती. कुणीही स्त्री या प्रेमजालात हरवली असती. ‘मी देवाजवळ खूप मागतो. सगळं मागतो. मग तो थोडं तरी देईलच ना? कंटाळून!’ आणि देवानं 24 एप्रिल 1975 ला त्यांचं मागणं पूर्ण केलं. या दोघांचं लग्न! बाईंना लग्नानंतर शाळेत अनेक ‘टोले’ सहन करावे लागले, पण झेलले झालं! आधी बेळगाव मग कोल्हापूर, गोवा… कल्याण आणि आता दादांचे कोवाड! जीवन धारेनं वाहत होतं. मनात भीती होती, पण दादा धीर देत होते. ‘मी आहे ना? आपण दोघं सोसू.’ दादांची प्रथम पत्नी सुनंदा येरवडय़ाच्या मेंटल इस्पितळात होती. त्यांचं एकटेपण त्यांनी मित्र, लेखन आणि मद्य यांच्या संगतीनं सोसलं होतं. त्यांना सरकारने ‘पद्मश्री’ देऊन गौरविलं होतं. पत्नीने सायंकाळी मुलींना वेळ न देता तो आपल्याला द्यावा अशी अपेक्षा करणाऱया रणजीतना निराशाच मिळे. त्यात मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतलेली ‘तिची’ भेट हा भाग वाचताना मन भरून येते.

माधवीचा जीव छोटय़ा गीतूत अडकला होता. ‘तिला घेऊन तू जाऊ शकतेस’ असं देसाई ताडकन म्हणाले . एवढा मोठा लेखक, त्याचा एवढा लौकिक, पण पाय मातीचेच. प्रथम पत्नी सुनंदाचे बेवारशी जिणे…माधवीचा चडफडाट. शेवटी संसार असेच चालतात सामान्यांचेही नि असामान्यांचेही… आणि या प्रेमसंबंधांची अखेर ‘मला मोकळं कर’ या कोरड्या, भयाण शब्दांत. माधवीच्या रडण्याचा कोणताही परिणाम या माणसावर होत नाही आणि 1800 रुपयांची पोटगी! मी माधवीला सुखरूप केलंय हा शेरा. ‘स्वामी’कारांची घटस्फोटित पत्नी म्हणून जगण्याचा सन्मानयीय परवाना!… चौदा वर्षे या माणसाबरोबर काढली! ज्या हातांनी पद्मश्री स्वीकारली त्या हातांनी घटस्फोटाच्या कागदावर सही केली? हात थरथरला नाही? ‘नाच गं घुमा’चा आक्रोश जिथे थांबतो तिथे तुमच्या मनात तो सुरू होतो हेच या पुस्तकाचे यश!

[email protected]