पुलंच्या स्मृतींची आनंदयात्रा

>> दत्तात्रय भालेकर

एखाद्या योद्धय़ाबद्दल माहिती सांगणारा जर योद्धाच असेल, ज्येष्ठ क्रीडापटूबद्दल भाष्य जर निपुण क्रीडापटूच करीत असेल तर जो आनंद कथन करणाऱयाला होतो अन् कथन – श्रवण ही प्रक्रिया जशी परिणामांपर्यंत पोहोचते तशीच परिस्थिती प्रा. श्याम भुर्के यांच्या ‘पु.ल. एक आनंदयात्रा’ या पुस्तकाच्या वाचनसमयी होते यात शंका नाही.

प्रस्तुत पुस्तकाचे लेखक प्रा. श्याम भुर्के यांनी पुलंच्या सहवासात बराच काळ घालवला अन् वेळोवेळी त्यांना पुलंच्या विनोदबुद्धीबरोबरच त्यांच्यातल्या हजरजबाबीपणाची, दानशूरपणाची, समाजातल्या आर्थिक – सामाजिकदृष्टय़ा कमकुवत वर्गाबद्दलच्या कणवेची झलक लेखक प्रा. श्याम भुर्के यांना दिसून आलीय. वेगवेगळ्या प्रसंगी घडलेल्या छोटय़ा-मोठय़ा कित्येक प्रसंगांचं टिपण लेखकाने केलंय ज्यामुळे वाचकाला पुलंविषयी अधिक माहिती मिळते. अर्थातच त्यामुळे पुलंबद्दलचा आदर दुणावतो.

लोकप्रिय विनोदी ज्येष्ठ लेखक द. मा. मिरासदार यांची खुमासदार प्रस्तावना या पुस्तकाला लाभलीय. आपल्या सात पानी प्रस्तावनेतून मिरासदार यांनी पुलंबद्दलच्या अनेक आठवणी – प्रसंग वाचकांसमोर मांडलेत. त्यापैकी एक आठवण… ‘नांदेडच्या त्या नाटय़ संमेलनाच्या काळात निवांत वेळी अशीच मैफल जमली हाती. त्या मैफलीत मीही एक श्रोता म्हणून बसलो होतो. शाब्दिक कोटय़ांनी श्रोते हसत होते. कुणीतरी मध्येच म्हणाले, ‘भाई तुमच्या या शाब्दिक कोटय़ा आणि विनोद ऐकून राम गणेश गडकऱयांची आठवण होते. ते असेच संभाषणचतुर होते म्हणतात…’ पु.ल. म्हणाले, ‘तुम्हाला एक गमतीचा योगायोग सांगू? गडकरी १९१९ च्या जानेवारी महिन्यात वारले. त्यांतर बरोबर नऊ महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर १९१९ मध्ये माझा जन्म झाला आहे’ हा योगायोग विलक्षण खरा!’

‘सभेत कसे बोलावे’, ‘मुक्काम पोस्ट सोलापूर’, ‘पुणं एक साठवण’, ‘खुमासदार अत्रे’ ही पुस्तके लिहिणारे लेखक प्रा. श्याम भुर्के यांनी विविध विषयांवर पंधराशेहून जास्त व्याख्यानं दिलेली आहेत. पुलंवरील प्रेमापोटी प्रा. श्याम भुर्के आणि गीता भुर्के यांनी ‘पु.ल. ः एक आनंदयात्रा’ हा कार्यक्रम आजवर सवाशेहून अधिक वेळा रसिकश्रोत्यांसमोर अर्थात पुलंच्या चाहत्यांसमोर सादर केला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयीकृत बँकेतल्या उच्चपदावरची नोकरी करता करता महाराष्ट्रभर जिथे जिथे बदल्या होत असत त्या त्या ठिकाणी या कार्यक्रमाचा आविष्कार भुर्के दांपत्याने घडवून आणलेला आहे. त्यांच्या उपक्रमातूनच या पुस्तकाची निर्मिती घडून आल्याचा उल्लेख प्रस्तावनेत द. मा. मिरासदार यांनी केलाय, तर मलपृष्ठावर पु.लं.च्या समाजाभिमुख जीवनावर भाष्य करणारा परिच्छेद अन् कविवर्य मंगेश पाडगावकरांनी पु.लं.वर रचलेल्या कवितेच्या चार ओळी छापल्या आहेत.

पु.लं.च्या सुरेख अकरा व्यंगचित्रांनी पुस्तकाचे मलपृष्ठ आणि मुखपृष्ठ आकर्षक बनवलंय घनश्याम देशमुख यांनी! पुस्तकाच्या आतील समर्पक चित्रंही घनश्याम देशमुख यांनी प्रसंगानुरूप रेखाटलेली दिसतात. प्रा. श्याम भुर्के यांनी निर्माण केलेले हे पुस्तक असे आहे की त्याचे वाचन कुठल्याही ठळकपणे छापलेल्या शीर्षकाला निवडून करावे असे आहे. त्यामुळेच हे पुस्तक लोकप्रिय ठरले असावे म्हणूनच की काय मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रतिष्ठत प्रकाशनाने दुसरी आवृत्ती काढली असं म्हणायला हरकत नाही. पु. ल. देशपांडे या थोर मराठी साहित्य़िकाला प्रा. श्याम भुर्के या त्यांच्या चाहत्याने दिलेली ही पुस्तकरूपी मानवंदना मराठी भाषिक वाचकांना अन् पुलंच्या चाहत्यांना, त्यांना अधिक जाणू पाहणाऱ्यांना पहिल्या आवृत्तीप्रमाणेच आवडेल असा या पुस्तकाचा आविष्कार आहे.

पु.ल. एक आनंदयात्रा
लेखक – प्रा. श्याम भुर्के
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ- ११४
मूल्य – ७५ रुपये