उगवत्या पिढीची जडणघडण

1

>> माधुरी महाशब्दे

आजची शिक्षण पद्धती, जीवघेणी स्पर्धा, त्या स्पर्धेला बळी पडणारी आजची पिढी, त्यांच्यापुढील आव्हाने हे आजचे ज्वलंत प्रश्न आहेत. लेखकाने पालक, शिक्षक आणि महत्त्वाकांक्षी लोक यांना केंद्रस्थानी ठेवून समुपदेशन करण्याचा प्रयत्न पुस्तकात केला आहे. लेखकाने अनेक यशस्वी व्यक्तींच्या भेटी घेतल्या. त्यांचे विचार, यश, काम करण्याची पद्धत यावर चर्चा केली. त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन रुजेल अशी आशा ते व्यक्त करतात. जीवनात यशप्राप्तीसाठी वेगवान शर्यत की मॅरेथॉन शर्यत यातील फरक, फायदे-तोटे याची उदाहरणे ते देतात. माणसाचे आयुष्य म्हणजे ‘मॅरेथॉन’ शर्यत आहे हे ठामपणे ते सांगतात.

जीवनात यश, प्रतिष्ठा, पैसा, मानसन्मान प्राप्त करण्याची व ही शर्यत जिंकण्याची इच्छा असणं स्वाभाविकच, परंतु त्यासाठी मानसिक सामर्थ्य, निर्धार, जबर इच्छाशक्ती, चिकाटी, हार न मानण्याची वृत्ती, वेळेचे योग्य नियोजन, शरीर व बुद्धिमतत्तेचा समतोल साधण्याची कुवत हे सारे दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत ती जिंकण्यासाठी आवश्यक असते. यासाठी स्वतःशीच स्पर्धा असावी. यासाठी मुलांची मानसिक जडणघडण ही जबाबदारी पालकांची असते. मुलांमधील नेतृत्वगुण, संघभावना, मित्रत्व, नात्यातील मोकळेपणा, निखळ आनंद हे व्यक्तिमत्त्व व चारित्र्याच्या जडणघडणीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते.

आयुष्यात यशस्वी झालेल्या व्यक्तींची उदाहरणे लेखकाने दिली आहेत. आपल्या देशातील इन्फोसिसचे नारायण मूर्ती, जी.एम.आर. ग्रुपचे, मल्लिकार्जुन राव, एच.सी.एल.चे शीव नाडर, धीरूभाई अंबानी, सेवा संस्थेमार्फत स्त्रियांसाठी कार्यरत असणाऱया इला भट्ट ही काही प्रातिनिधिक उदाहरणे दिली आहेत. यापैकी काही व्यक्ती सामान्य शाळेत, महाविद्यालयात शिकले. कमी दर्जाच्या शाळेत, महाविद्यालयातच शिकलं पाहिजे तरच तो आयुष्यात यशस्वी होतो असे नाही हे लेखक सांगू इच्छितात.

मुलांनी अभ्यासाखेरीज भरपूर वाचन करावे. पालक, शाळा यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. मुलांच्या बुद्धीला चालना देणारी शिक्षण पद्धती हवी आहे. जीवनात ध्येयाने झपाटलात की यश खात्रीने प्राप्त होते. त्यासाठी त्याला कुटुंबाकडून, पालकांकडून, शिक्षकांकडून प्रोत्साहन मिळायला हवे तर मूल यशस्वी होते.

शर्यत शिक्षणाची
लेखक – ले. व्ही. रघुनाथन
प्रकाशक – रोहन प्रकाशन
पृष्ठ – 172, मूल्य – 160