मालवणचे दोन्ही प्रवेशद्वार ‘धोकादायक’

कसाल मालवण मुख्य रस्त्यावरील शहराच्या प्रवेश द्वारावर सहा महिन्यापूर्वी खचलेला रस्ता. (अमित खोत)

सामना प्रतिनिधी, मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेल्या मालवणला जोडणारे दोन्ही प्रमुख रस्ते शहराच्या प्रवेशद्वारावरच धोकादायक बनले आहेत, या रस्त्यांची अवस्था एवढी खराब आहे की, मुख्य रस्तेच बंद करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर आली आहे. दोन्ही मुख्य रस्त्यांना पर्यायी रस्त्याची मलमपट्टी लावण्यात आली आहे. धोकादायक रस्त्याबाबत वर्ष उलटले तरी कोणत्याही उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, पुढील पर्यटन महिन्यापासून शाळा महाविद्यालयांच्या सहली तसेच देशी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होणार असून बांधकम विभाग धोकादायक मुख्य रस्ते पूर्व स्थितीत आणणार का? असा सवाल सर्वसामान्य जनते कडून उपस्थित केला जात आहे.

कसाल रस्ता खचला

कसाल मालवण या मुख्य रस्त्यावर मालवण शहराच्या प्रवेश द्वारावरच (जरीमरी उतार) सहा महिन्यापूर्वी संरक्षक कठडा व रस्ता खचला होता. सुमारे ७० ते ८० फुट खोल या खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी बांधकाम विभागाने रस्त्यावरच लोखंडी पिंपे उभी केली. तसेच रस्ता वाहतुकीस धोकादायक असल्याचे फलकही लावण्यात आले. गटाराच्या बाजूने तात्पुरत्या स्वरुपात लाल मातीचा रस्ता तयार करण्यात आला. मात्र दुरुस्तीच्या कोणत्याही उपाययोजना अद्यापही बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या धोकादायक रस्त्यावरूनच वाहनाची ये – जा सुरु आहे. त्यामुळे एखाद्या मोठ्या अपघाताची वाट तर सार्वजनिक बांधकाम विभाग बघत नाही ना असा सवालही उपस्थित होत आहे.

कोळंब पूलाची वाहतूक बंद

मालवण शहराला जोडणारा दुसरा मुख्य रस्ता म्हणजे देवगड,आचरा, मालवण, या रस्त्यावरील कोळंब पूल धोकादायक बनल्याने गेले वर्षभर या रस्तावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद आहे. पुलाची वारंवार झालेली तपासणी तसेच अल्प प्रतिसादामुळे रखडलेली निविदा प्रक्रिया यामुळे पुलाच्या दुरुस्तीस वर्षभर ब्रेक लागला आहे.

डिसेंबरपासून मोठा पर्यटन हंगाम सुरू होतो. दहीकाले आणि वार्षिकोत्सवाचा हंगाम, जग प्रसिध्द आंगणेवाडी यात्रा आदी निमित्ताने मालवणात लाखोच्या संख्येने पर्यटक दाखल होतात. याच कालावधीत सहलीही मोठ्याप्रमाणात येतात. आंगणेवाडी यात्रोत्सव फेब्रुवारी महीन्यात असतो. त्यामुळे मोठ्या संख्येने वाहनाची ये जा या दोन्ही रस्त्यावरून होणार आहे. लवकरात लवकर हे रस्ते सुस्थितीत करावेत अशी मागणी नागरिक व वाहन चालकांकडून केली जात आहे.