आशिया कपसाठी युवा गोलंदाज खलील अहमद नवा चेहरा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानी क्रिकेट संघाची शनिवारी मुंबईत आशिया कपसाठी घोषणा करण्यात आली. टीम इंडियामध्ये 20 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद याला संधी देण्यात आली आहे. तसेच आगामी वेस्ट इंडीज व ऑस्ट्रेलिया या प्रमुख देशांचा विचार करता विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय सीनियर राष्ट्रीय निवड समितीकडून यावेळी घेण्यात आला. त्यामुळे हिंदुस्थानचे नेतृत्व मुंबईकर रोहित शर्माकडे सोपविण्यात आले आहे. याचसोबत केदार जाधव, अंबाती रायुडू, मनीष पांडे या तीन खेळाडूंचे राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे.

अतिक्रिकेटमुळे खेळाडूंवर येणारा ताण कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. याची सुरुवात विराट कोहलीने केलीय. टीम इंडियातील प्रत्येक प्रमुख खेळाडूला आलटून पालटून आराम देण्यात येणार आहे, असे उद्गार निवड समितीचे चेअरमन एम. एस. के. प्रसाद यांनी काढले.

रैना, अय्यर, कौल, उमेशला वगळले
हिंदुस्थानने इंग्लंडविरुद्ध मागील वन डे मालिका खेळली त्यावेळी संघात असलेल्या चार खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आलेले नाही. यामध्ये रैना, अय्यर, कौल व उमेश यांचा समावेश आहे.

नवा चेहरा कोण?
आशिया कपसाठी राजस्थानचा 20 वर्षीय गोलंदाज खलील अहमदला टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे. ‘द वॉल’ राहुल द्रविडचा हा शिष्य आहे. आतापर्यंत त्याने 17 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये 4.74 च्या सरासरीने 28 फलंदाजांना बाद केले आहे. जयदेव उनाडकट व बरिंदर सरण या डावखुऱया गोलंदाजांना पडताळून पाहिल्यानंतर खलील अहमदला संघात चान्स देण्यात आलाय.

हिंदुस्थानचा संघ खालीलप्रमाणे
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), मनीष पांडे, केदार जाधव, अंबाती रायुडू, हार्दिक पांडय़ा, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, खलील अहमद.