बाप बनण्यासाठी घट्ट बनू नका, भोंगळ कारभार ठरू शकतो फायदेशीर

सामना ऑनलाईन, बोस्टन

विदेशातील संशोधक चित्र-विचित्र गोष्टींवर संशोधन करीत असतात. सार्वजनिक आरोग्याबाबत संशोधन करणाऱ्या बोस्टनमधील एका विद्यालयातील दोन संशोधकांनी कोणत्या प्रकारची अंतर्वस्त्रे वापरल्यास पुरुष बाप बनण्याची अधिक शक्यता असते यावर संशोधन केलं. या संशोधकांनी दावा केला आहे की घट्ट अंतर्वस्त्र घालणाऱ्या पुरुषांपेक्षा ढगळ अंतर्वस्त्र घालणारे पुरूष बाप वनण्याची शक्यता अधिक असते.

लिदीया आलारकॉन  जॉर्ज चावारो हे हार्वर्ड टीएच चानमध्ये संशोधन करीत आहेत. त्यांनी ६५६ पुरुषांचा नमुने म्हणून वापर करत त्यांचे संशोधन पूर्ण केलं. हे सगळे पुरुष १८ ते ५६ वयोगटातील होते आणि मूल होत नाही म्हणून  वैद्यकीय उपचार घेणारे होते. संशोधनाअंती या संशोधकांना कळालं की जे पुरुष ढगळ अंत:र्वस्त्र परिधान करतात त्यांच्यात शुक्राणूंची संख्या जास्त आहे. शुक्राणूंची चांगली वाढ होण्यासाठी अंडकोषांचे तापमान शरिराच्या तापमानापेक्षा ३ ते ४ डिग्री सेल्सियस कमी असणं अपेक्षित असतं. घट्ट अंतर्वस्त्र घातल्याने हे तापमान कमी होण्याऐवजी वाढतं ज्याच्यामुळे शुक्राणूंची वाढ होत नाही. ढगळ अंतर्वस्त्र घातल्यास हवा खेळती राहते ज्यामुळे अंडकोषांचे तापमान शरिरापेक्षा कमी राहण्यास मदत होते.