बर्गरमधली मिरची भोवली, महिन्याचा उपवास घडला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पैज जिंकण्यासाठी प्रमाणाबाहेर मिरची बर्गर खाणे दिल्लीतील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. अतितिखट खाल्याने त्याच्या आतड्यांवरील अस्तर फाटले असून शस्त्रक्रिया करुन ते काढले जाणार आहे. पोटातील ही जखम भरुन येण्यास महिन्याभराचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यत या तरुणास उपवास करावा लागणार आहे. गर्व गुप्ता असे या तरुणाचे (२१) नाव असून तो दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी आहे.

खाण्यापिण्याची आवड असलेल्या गर्वला पश्चिम दिल्लीतील एका हॉटेलच्या जाहिरातीने भुरळ घातली. जो कोणी दिवसभरात जास्तीत जास्त मिरची बर्गर खाऊन दाखवेल त्याला बक्षिस म्हणून हॉटेलतर्फे महिनाभर मोफत जेवण दिले जाईल, अशी ती जाहीरात होती. गर्वने हसत हसत त्यास तयारी दर्शवली. त्यानंतर त्याने पन्नासहून जास्त झणझणीत मिरची टाकलेले बर्गर खाल्ले व हॉटेलची पैज जिंकली. पण पैज जिंकल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. प्रमाणाबाहेर तिखट खाल्ल्याने रात्रीच त्याचे पोट दुखू लागले. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र पोटाचे दुखणे वाढले व त्याला उलटी झाली. उलटीत रक्त पडत असल्याचे बघून गर्वच्या पायाखालची जमीनच घसरली. त्याने थेट रुग्णालयात धाव घेतली व डॉक्टरांना सगळा वृत्तांत सांगितला. त्याचे बोलणे ऐकून डॉक्टरही चक्रावले. त्यानंतर ताबडतोब त्याच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. यावेळी तिखट खाल्ल्याने त्याच्या आतड्यांवरील अस्तर फाटल्याचे समोर आले. हे अस्तर शस्त्रक्रिया करुन काढले जाणार आहे. ही जखम भरण्यास महिन्याभराचा कालावधी लागणार असून तोपर्यत गर्वला द्रव पदार्थांवरच राहावे लागणार आहे.